आर्यन खानसोबत आर्थर रोड तुरुंगात एकत्र असल्याची मोठेपणा करणाऱ्या आणि तशा मुलाखती प्रसिद्धी माध्यमांना देणं एका युवकाला महागात पडलं आहे. या युवकाचं नाव श्रवण नाडर असं आहे. आपण आर्यन खानसोबत तुरुंगात एकत्र होतो, असा दावा ही व्यक्ती करत होती आणि आता पोलिसांनी त्याला बेडया ठोकल्या आहेत.
श्रवण नाडर हा मूळचा तमिळनाडूचा आहे. तो मानखुर्दचा रहिवासी आहे. एका चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती आणि त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलं होतं. शनिवारी त्याने न्यूज चॅनेलला मुलाखती देताना आर्यन खानला ज्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आलं होतं त्याच बॅरेकमध्ये त्यालाही ठेवण्यात आलं होतं अशी बढाई मारली. या प्रकारची बढाई मारुन तो प्रसिद्धी मिळवू पाहत होता.
नाडर ज्यावेळी माध्यमांशी मुलाखती देण्यात व्यग्र होता, त्यावेळी योगायोगाने गेल्या आठ महिन्यांपासून घरफोडीच्या प्रकरणात नाडरचा शोध घेत असलेल्या जुहू पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला टीव्हीवर पाहिले. त्यांनी ताबडतोब स्थानिक गुन्हे शाखेच्या (कक्ष - ३) अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि त्यानंतर नाडरला कारागृहाच्या बाहेरून ताबडतोब ताब्यात घेण्यात आले आणि गुन्हे शाखेच्या कक्षामध्ये नेण्यात आले. नंतर त्याला जुहू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत माने म्हणाले, नाडरवर घरफोडी आणि चोरीचे १३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आमच्या पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असून गेल्या आठ महिन्यांपासून घरफोडीच्या एका प्रकरणी त्याचा शोध सुरु होता.
त्याने मुलाखतीत दावा केला की, ते दोघेही जवळपास एकाच वेळेला आर्थर रोड तुरुंगात आले होते. जवळपास १० दिवस ते एकत्र होते. त्यानंतर त्याला जामीन मिळाल्याने तो बाहेर आला. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन आणि इतर दोघांना जामीन मंजूर केला, तेव्हा आर्यन बाहेर येईल या अपेक्षेने नाडर आर्थर रोड तुरुंगात गेला होता. मात्र तसे झाले नाही.
यावेळी नाडरने काही प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला आणि त्याने मी आर्यनला तुरुंगात रडताना पाहिलं आणि त्याने केस देखील कापले होते, असा खोटा दावा केला. तसेच आर्यनने त्याला विनंती केली होती की, तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना म्हणजेच शाहरुख खानला जाऊन भेटावं आणि मला तुरुंगात काही पैसे पाठवावेत. त्यानुसारच, तो वांद्रे येथील शाहरुख खानच्या घराबाहेर आर्यनच्या कुटुंबीयांना भेटायला गेला होता. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्याला झिडकारून लावले.