पनवेल - खारघर शहरातील वर्दळीच्या हिरानंदानी चौकात रात्रीच्या वेळेला सापडलेल्या संशयास्पद बॅगेतून सुमारे 45 हजार, लॅपटॉप तसेच महत्वाचे कागदपत्र खारघर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला प्रामाणिकपणे परत केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
पोलीस शिपाई सुनील अंबुर्ले व विशाल वाघ या दोघांना ही बॅग गस्तीवर असताना आढळली होती. संबंधित बॅगची प्राथमिक स्तरावर पाहणी करून दोघेजण ही बॅग खारघर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. संबंधित बॅग पोलीस स्टेशनमध्ये व्यवस्थितरित्या बघितल्यावर ही बॅग बिपीन गौतम यांची असल्याचे कागदपत्रावरून सिद्ध झाले. यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या ठाणे अंमलदार यांनी खारघर पोलीस ठाण्याचे प्रदीप तिदार यां यासंदर्भात माहिती दिल्यावर त्यांच्या आदेशाने त्वरित बिपीन गौतम यांना बॅगची माहिती देऊन पोलीस स्टेशनमध्ये बोलावून ही बॅग सुपूर्द करण्यात आली. यावेळी गौतम यांनी पोलिसांचे आभार मानले. रोख रक्कमेसह महत्वाच्या कागदपत्रांचा समावेश या बॅग मध्ये होता. त्यामुळे बिपीन यांना आपली गमावलेली बॅग परत मिळाल्याने मोठा आनंद यावेळी झाला. पोलीस दलातील कर्तव्यदक्ष या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे वरिष्ठाकडून देखील यावेळी अभिनंदन करण्यात आले.