मधुकर ठाकूर
उरण : उरण- नवघर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या कर्मचाऱ्यांनेच अशिक्षित महिलेची ३१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बॅकेच्या विरोधात बॅकेसमोरच महिलेने कुटुंबीयांसह सोमवारपासून न्याय मिळेपर्यंत " भीक मांगो " आंदोलन सुरू केले आहे. महिलेच्या या अनोख्या आंदोलनामुळे मात्र बॅक कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
उरण तालुक्यातील नवघर गावात बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे.या शाखेतच भेंडखळ गावातील ५० वर्षीय महिला प्रज्वला लक्ष्मण ठाकूर यांचे बचत खाते आहे. आर्थिक नुकसान भरपाई पोटी प्रज्वला यांना २० लाख व १६ लाख अशी ३१ लाखांची रक्कम दोन धनादेशाने मिळाली होती.या दोन्ही धनादेशाद्वारे मिळालेली ३१ लाखांच्या रक्कमेचे धनादेश खात्यात जमा होताच फिक्स डिपॉझिटमध्ये टाकण्याची प्रज्वलांची इच्छा होती.त्यासाठी स्वाक्षऱ्या करून धनादेश दिल्यास ३१ लाखांच्या फिक्स डिपॉझिटच्या पावत्या ३-४ दिवसात तुम्ही बॅकेत येऊन घेऊन जा असे बॅकेचे कर्मचारी मकरंद दिनानाथ भोईर सांगितले होते.बॅकेच्या कर्मचाऱ्यांशी नेहमीच विश्वासाचे संबंध असल्याने बॅकेचे कर्मचारी मकरंद दिनानाथ भोईर यांच्याकडे प्रज्वला ठाकूर यांनी मोठ्या विश्वासाने १६ व २० लाखांचे कोरे धनादेश स्वाक्षऱ्या करून दिले होते.
त्यानंतर पाच-सहा दिवसांनी बॅकेत फिक्स डिपॉझिटच्या पावत्या आणण्यासाठी प्रज्वला ठाकूर गेल्या होत्या.मात्र प्रत्येक वेळी मकरंद भोईर यांनी विविध प्रकारची तकलादू कारणे दाखवून प्रज्वला ठाकूर यांना वाटेला लावले.मात्र मकरंद भोईर शाखेत अनुपस्थित असताना शाखेत चौकशी करण्यासाठी गेलेल्या असताना मात्र खात्यात पैसेच शिल्लक नसल्याने पैसे फिक्स डिपॉझिट करण्यात आले नसल्याची अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली. पासबुकच्या तपासणीनंतर २० आणि १० लाखांच्या दोन धनादेशाव्दारे ३० लाखांची रक्कम चेतन इंटरप्रायझेस नावाने असलेल्या कंपनीच्या करंट बॅक खात्यात जमा झाले असल्याचे आढळून आले.हे करंट खाते मकरंद भोईर यांच्या भावाच्या नावाने असल्याची माहितीही समोर आली.
यानंतर पायाखालची जमीन सरकलेल्या प्रज्वला लक्ष्मण ठाकूर यांनी बॅक व्यवस्थापक आणि उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीनंतर बॅक अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी अनेकवेळा महिलेला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली जोरबैठका मारल्या.मात्र वर्षभराच्या कालावधीनंतरही त्यातून काहीएक निष्पन्न झाले नाही.त्यामुळे आयुष्यभराची सर्वस्वी असलेली पुंजी परत मिळविण्यासाठी आणि न्यायासाठी फसवणूक झालेल्या प्रज्वला लक्ष्मण ठाकूर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या कर्मचाऱ्यांनेच ३१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नवघर शाखेच्या विरोधात बॅकेसमोरच कुटुंबीयांसह सोमवारपासून न्याय मिळेपर्यंत " भीक मांगो " आंदोलन सुरू केले आहे.या अनोख्या पद्धतीच्या आंदोलनाला येथील अनेक राजकीय पक्षांचे पुढारी, नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
दरम्यान या अशिक्षित महिलेच्या फसवणूकीप्रकरणी बॅक ऑफ महाराष्ट्रचे डेप्युटी झोनल मॅनेजर सौरभ सिंग यांनी माहिती देण्यास नकार दिला.तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यापासूनच आरोपी फरार झाला आहे.आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली