जालना : एका व्यापाऱ्याच्या घरात काम करणाऱ्या तीन महिलांनी आलमारीची डुबलीकेट चावली बनवून जवळपास ४३ लाख ७७ हजार ३७१ रुपयांच्या हिऱ्यांसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना जालना शहरातील बडीसडक रोडवरील बगडिया हाऊस येथे उघडकीस आली. या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बडी सडक येथे व्यापारी मनीष पन्नालाल बगडिया (४०) यांचे घर आहे. त्यांच्या घरात तीनही महिला काम करतात. त्यांनी संगनमत करून आलमारीची डुबलीकेट चावी बनविली. या चावीद्वारे १ लाख ४० हजार ८८० रुपये किमतीची सोन्याची फॅन्सी चेन, १ लाख ८७ हजार ३२५ रुपये किमतीचे डायमंड पॅन्डल सेट, २५ हजार ५४० रुपये किमतीचे डायमंड, सोन्याचे पॅन्डल सेट, १ लाख २ हजार १६० रुपये किमतीची हातातील डायमंड रिंग, ६७ हजार ६१५ रूपये किमतीचे हातातील ब्रासलेट, १ लाख १० हजार १०५ रुपये किमतीचे दोन हातांतील डायमंडच्या अंगठ्या, २ लाख ३० हजार २१६ रुपये किमतीचे डायमंडचे पॅन्डल सेट, १ लाख ४१ हजार ८४९ रुपये किमतीची डायमंडची घड्याळ, चार लाख रुपये किमतीचा कानातील हिऱ्याचा झुमका, ४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या कानातील डायमंडच्या एअर रिंग, १ लाख ५० हजार रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी, २ लाख ८१ हजार ९० रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी, १० लाख २६ हजार ८११ रुपये किमतीच्या सोने आणि हिऱ्याच्या बांगड्या, १ लाख ८० हजार रूपये किमतीचे सोन्याचे नाणे, ८ लाख ७८ हजार ७८० रुपये किमतीचा एक गळ्यातील हिऱ्याचा हार आणि रोख रक्कम पाच हजार रूपये ३० नोव्हेंबरपासून लंपास केल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात येताच, मनीष बगडिया यांनी सदर बाजार पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी घरात काम करणाऱ्या तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी भेट दिली. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे.