इटलीच्या सिसिली कोस्टजवळ २ हजार किलो कोकीन पाण्यावर तरंगताना आढळल्याचं पाहून अधिकारी अवाक् झाले. जवळपास ७० वॉटरप्रूफ पॅकेटमध्ये सील करून कोकिन समुद्रात फेकण्यात आले होते. पाण्याच्या प्रवाहाने हे इटलीच्या दिशेने जात होते. या कोकिनची किंमत जवळपास ३ हजार कोटीहून अधिक आहे. हे कोकिन कस्टम विभागाने जप्त केले आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्सचा साठा असल्याचं इटलीच्या पोलिसांनी म्हटलं.
सिसिली कोस्टवर पाण्यावर तरंगणाऱ्या २ हजार किलो कोकिनच्या साठ्यावर इटलीच्या मॅरिटाईन सर्व्हिलान्स एअरक्राफ्टची नजर पडली. त्यानंतर तात्काळ ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली. ७० पॅकेट कोकिन कस्टम विभागाने जप्त केले. जेव्हा हे सीलबंद पॅकेट पोलिसांनी कार्यालयात आणले तेव्हा त्यात कोकिन असल्याचे समोर आले. हे पॅकेट मासे पकडण्याच्या जाळ्यात बांधून समुद्रात फेकण्यात आले होते. त्याचसोबत त्याला लुमिनस ट्रॅकिंग डिवाईसही बांधले होते. जेणेकरून ते रिकव्हर केले जाईल.
अधिकाऱ्यांच्या मते, एका कार्गो शिपमधून हे फेकण्यात आले होते. कोकिन तस्करांनी हा कारनामा केला असून ट्रॅकिंगच्या सहाय्याने पुन्हा याचा शोध घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी सप्लाय करण्याचा त्यांचा इरादा होता. समुद्रात अशाप्रकारे कोकिन पकडले जाणे हे काही नवीन नाही. याआधी फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलँडच्या प्रशांत महासागरात ३५०० किलो कोकिन जप्त करण्यात आले होते. त्याची किंमत ४ हजार कोटी होती. कोकिनचे ८१ पॅकेट काळ्या आणि पिंक कलरच्या बॉक्समध्ये ठेवले होते. त्यानंतर ते सील करून प्रशांत महासागरात टाकण्यात आले. तस्करी ही सप्लाय ऑस्ट्रेलियामध्ये करणार होते असं अधिकाऱ्यांनी सांगितले.