उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात माजी आमदार बनून अधिकाऱ्यांना ढोस देणाऱ्या ठगास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डिबाई पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलीय. बदायू जनपथच्या बिल्सी विधानसभेचा माजी आमदार असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना धमकी देणाऱ्या आरोपी संजय ओझाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा बुलंदशहरच्या जहाँगीराबाद येथील रहिवाशी आहे.
आरोपी संजय ओझा हा कुठेही आणि कधीही आपण माजी आमदार असल्याची बतावणी करुन लोकांची फसवणूक करायचा. विशेष म्हणजे प्रदेशातील डीजीपी, सचिव आणि जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांना बिल्सीचा माजी आमदार असल्याचे सांगून कामं करायला भाग पाडायचा. अनेकदा फोनवरुनच ढोसही द्यायचा. अधिकाऱ्यांना फोन करुन शिफारस करायचा. ज्या लोकांचे काम करायचा, त्या लोकांकडून पैसे घेण्याचंही काम हा ओझा करायचा.
दरम्यान, यापूर्वी डिबाई पोलीस ठाण्यात जानेवारी २०२२ मध्ये डुप्लीकेट डेप्युटी कमांडंट बनून लोकांची फसवणूक करणाऱ्या भूपेंद्र नावाच्या आरोपीला अटक केली होती. आत्तापर्यंत भूपेंद्र आणि संजय ओझा यांनी अनेक युवकांची नोकरी लावतो असे सांगून आर्थिक फसवणूक केलीय. तर, संजय ओझाने एकाकडून एफआयआर रद्द करायला लावतो, असे सांगत तब्बल १५ लाख रुपयेही घेतले होते. मी बिल्सीचा माजी आमदार आर.के. शर्मा बोलतोय... असे म्हणत फोनवरुन तो अधिकाऱ्यांना शिफारस आणि ढोस देत होता. अखेर, रेल्वे पोलिसांनी संजय ओझाचा पर्दाफाश केला.