मध्य प्रदेशातील जबलपूर रेल्वे कर्मचारी आणि 8 वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. या हत्येप्रकरणी आरोपी तरुणासोबत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या 16 वर्षीय मुलीचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळेच तो बेपत्ता आहे. पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी तरुण आणि मुलगी एकत्र कॉलनीच्या गेटमधून बाहेर पडल्याचे समोर आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये हत्या झालेल्या व्यक्तीची मुलगी आरोपीसोबत दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. घटनेनंतर आरोपी पळून गेल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण झाल्याची शक्यता संपुष्टात आली आहे. ती आरोपींसोबत इतर ठिकाणी फिरताना दिसली आहे.
पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, रेल्वे कर्मचाऱ्याची 16 वर्षीय मुलगीही आरोपी मुकुलसोबत घरापासून रेल्वे स्थानक आणि बसस्थानकापर्यंत जाताना दिसली. गुन्हे शाखेचे एएसपी समर वर्मा यांनी सांगितलं की, 14 आणि 15 मार्चच्या रात्री शेजारी राहणारा तरुण मुकुल रेल्वे कर्मचारी राजकुमार विश्वकर्मा यांच्या घराभोवती ये-जा करताना दिसला. त्याजवळ गॅस कटर, पॉलिथिन अशा वस्तू दिसल्या.
या घटनेनंतर दुपारी बाराच्या सुमारास मुकुल हा लाल रंगाच्या स्कूटरवरून कॉलनीतून बाहेर पडला आणि रेल्वे कर्मचाऱ्याची मुलगीही त्याच्या मागे गेली. यानंतर दोघेही रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर एकत्र दिसले. एएसपी म्हणाले की, हत्या करणाऱ्या आरोपीने फ्लॅटच्या मागे असलेल्या स्वयंपाकघरातील खिडकी गॅस कटरने कापली आणि नंतर घरात प्रवेश केला.
राजकुमार आणि त्यांच्या 8 वर्षांच्या मुलाची हत्या केली. यानंतर मुलाचा मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळून आधी किचनमध्ये आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवण्यात आला. यानंतर आरोपी घरातून बाहेर आला, दाराला कुलूप लावून पळून गेला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेनंतर मुकुल आणि रेल्वे कर्मचाऱ्याची मुलगी दोघेही फरार झाल्याचं समोर आलं आहे.