नवी दिल्ली - वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता पाऊल उचलली जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं महागात पडू शकतं. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू आहेत. याच दरम्यान देशातील अनेक खासगी शाळांमध्ये (Private school) प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
शाळा प्रशासनाने पालकांकडून सक्तीने फी वसूल (School fee) करण्यासाठी धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या जबलपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी शाळेच्या संचालकाने पालकांकडून फी वसूल करण्यासाठी गुंडगिरीचा मार्ग अवलंबला आहे. त्याने पालकांना एका रुममध्ये बोलावून त्यांच्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विद्यार्थ्यांची शाळेची फी वसूल करण्यासाठी अशा पद्धतीने पालकांना धमकावल्यानंतर पालकांनी तातडीने शाळेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूर शहरातील प्रसिद्ध शाळा 'जॉय सीनियर सेकंडरी स्कुल'मध्ये हा प्रकार घडला आहे. या शाळेच्या संचालकाचं नाव अखिलेश मेबन असून त्यांनी शाळेची फी वसूल करण्यासाठी गुंडगिरी केली आहे. अखिलेश यांनी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाला एका बंद खोलीत बोलावून त्यांना गार्डद्वारे गोळी मारण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पालकांना शिवीगाळ देखील केल्य़ाची माहिती मिळत आहे. आरोपी संचालकाविरूद्ध धमकी देण्यासोबत अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाच्या संकटात "या" राज्याने घेतला मोठा निर्णय; पहिली ते आठवीची शाळा 15 एप्रिलपर्यंत बंद
कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एका राज्याने मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा ही 15 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. मध्य प्रदेश सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मध्य प्रदेशमध्ये 31 मार्च 2021 पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मध्य प्रदेशच्या शिक्षण विभागाने 1 ली ते 8 वीपर्यंतची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.