लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंजाबचा ठग विकासक जगदीश अहुजा याचा गाशा गुंडाळण्यात आर्थिक गुन्हे शाखेला शुक्रवारी यश आले आहे. त्याच्यावर तीन फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याचा मुलगा गौतम याच्यासोबत मिळून त्याने मुंबईतील एका व्यावसायिकाची २७ कोटींची फसवणूक केल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कफ परेड येथील व्यावसायिक रवी वासवानी (५७) यांनी याप्रकरणी सांताक्रुझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वासवानी यांच्या तक्रारीनुसार, आरोपी अहुजा प्रॉपर्टीज ॲण्ड असोसिएट्सचे पार्टनर गौतम जगदीश अहुजा व त्याचे वडील जगदीश भगवानदास अहुजा यांनी वासवानी व त्यांचे नातेवाईक यांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून स्वतःच्या व्यवसाय वाढीकरिता गुंतवणुकीस प्रेरित करून गुंतविलेल्या रकमेवर चांगला परतावाही दिला. त्यांच्याकडून गुंतवणुकीची रक्कम स्वीकारत त्या बदल्यात आरोपीने त्यांच्या चुनाभट्टी सायन येथील प्रोजेक्टमध्ये पर्यायी ४ फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले. मात्र, अजूनपर्यंत त्यांना ते फ्लॅट देण्यात आलेले नाहीत.
चेक बाऊन्सची ३३५ प्रकरणे दाखल आरोपींवर मुंबईतील विविध न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट १८८१ अन्वये म्हणजे चेक बाऊन्सची ३३५ प्रकरणे दाखल आहेत. त्यानुसार जगदीश याला या गुन्ह्यामध्ये १६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे, तर त्याचा मुलगा गौतम हा अजूनही फरार आहे.