पुणे : लग्नाचे आमिष आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर दोन वर्ष बलात्कार करणा-याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा आदेश दिला आहे. अक्षय गुलाबसिंग प्रजापती (वय १९, रा. पिंपळे गुरव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. १७ वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना २०१२ ते ५ फेब्रुवारी २०१४ या कालावधीत आळंदी, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग आणि पिंपळे गुरव येथे घडली. पीडित मुलीचे कुटुंब मुंढवा येथे रहायला असून ती शिक्षणासाठी मामाकडे राहत होती. प्रजापती याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर बदनामी करण्याची आणि तिला व कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील उज्ज्वला रासकर यांनी काम पहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यातील पीडित मुलीची साक्ष आणि वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरले. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. पीडित मुलगी सहमतीने पळून गेली होती. तसेच तिला सर्व बाबींची समज होती, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. मात्र, ती जरी सहमतीने पळून गेली असली, तरीही तिने शरीरसंबंध ठेवण्यास विरोध केला होता. असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने प्रजापतीला शिक्षा सुनावली.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-याला सक्तमजुरीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 7:15 PM