अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी. शिंगाडे यांच्या न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवीत एक वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच तीन हजार रुपये दंड ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
शेख अहमद शेख आझाद (२५) हा एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत असे यासोबतच ती रस्त्याने जात असताना तीचा हात पकडले यासह विविध प्रकारे त्याने या अल्पवयीन मुलीचा छळ सुरु केला होता. ही मुलगी १८ सप्टेंबर २०१४ रोजी रस्त्याने जात असतांना आरोपी शेख अहमद याने तीचा पाठलाग करून रस्त्यात अडवीले त्यानंतर विनयभंग करून अश्लील वर्तन केले. त्यामुळे घाबरलेल्या या अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगीतला. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने खदान पोलिस ठाणे गाठून शेख अहमद याच्याविरुध्द तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी शेख अहमद याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर खदान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्रन्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांच्या न्यायालयात झाली. त्यांच्या न्यायालयाने सरकार पक्षातर्फे पाच सक्षीदार तपासल्यानंतर न्यायाधीशांनी कलम ३५४ (ड) अन्वये शेख अहमद यास दोषी ठरवीले. या गुन्हयात त्याला एक वर्ष साधी कैद आणि तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षाही ठोठावण्यात आली.