२ कोटींची लाच मागितल्याच्या आरोपाखाली काल राजस्थानमध्ये एएसपी दिव्या मित्तल यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आता नवे खुलासे समोर आले आहेत. मित्तल यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. सोमवारी दिव्या मित्तल यांना अटक केल्यानंतर एसीबीने मंगळवारी न्यायालयात हजर केले आणि रिमांडची मागणी केली होती.
यावर न्यायालयाने एएसपी दिव्या मित्तल यांना ३ दिवसांच्या कोठडीवर एसीबीच्या ताब्यात दिले. आता त्यांची जयपूर एसीबी मुख्यालयात २० जानेवारीपर्यंत कोठडीत चौकशी केली जाणार आहे. २०२३ च्या सुरुवातीला समोर आलेले हे लाच प्रकरण सध्या राजस्थानमध्ये खूप चर्चेत आहे.
'अजमेरमधील हरिद्वारस्थित ड्रग्ज विक्रेत्याविरुद्ध अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास जिल्हा पोलिसांकडून एसओजीच्या प्रभारी अतिरिक्त एसपी दिव्या मित्तल यांच्याकडे आला होता. एसओजीच्या एएसपी दिव्या मित्तल यांनी या प्रकरणातील बडतर्फ कॉन्स्टेबल सुमित कुमार याच्यामार्फत २ कोटी रुपयांची लाच मागितली होती. यामध्ये ५० लाख रुपयांची लाच देण्याचे ठरले. मात्र त्यापूर्वीच पीडितेने एसीबी गाठून आपली तक्रार दाखल केली होती.
एसीबीला तक्रार मिळाल्यानंतर रंगेहात पकडण्यासाठी एसीबीने जाळे रचला होता. पण, याला यश आले नाही. अखेर पुराव्याच्या आधारे एसीबीने लाच मागितल्याचा गुन्हा नोंदवून दिव्या मित्तल यांना निवास्थानी छापे टाकून पुरावे गोळा केले. त्यानंतर पुराव्याच्या आधारे सोमवारी सायंकाळी दिव्या मित्तल यांना अटक करण्यात आली.
दिव्या मित्तल यांच्या अटकेमुळे राजस्थान पोलीस आणि एसओजीमध्ये खळबळ उडाली आहे. 'मी ड्रग माफियांच्या कटाची शिकार झाली आहे, अशी प्रतिक्रिया एएसपी दिव्या मित्तल यांनी माध्यमांना काल दिली.
दिव्या मित्तल यांनी आरोपीला कार्यालयात बोलावले होते. यावेळी त्यांनी आरोपीकडे ५० लाख रुपयांची लाच मागितली होती. यामध्ये २५ लाख रुपये तात्काळ आणि २५ लाख रुपये नंतर देण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला आहे.