जयपूरमध्ये व्यावसायिक लतेश गोयल यांचा घराच्या बाल्कनीतून संशयास्पद परिस्थितीत पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. पत्नी स्नेहाने वडिलांना बाल्कनीतून ढकलून मारल्याचा आरोप लतेश गोयल य़ांचा मुलगा हनी गोयल याने केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वडिलांच्या मृत्यूपूर्वी रस्ता अपघातात आई आणि बहीण गमावलेल्या हनीने स्नेहासोबत प्रेमविवाह केला होता.
हनी गोयलने वडिलांच्या मृत्यूनंतर एक व्हिडीओ जारी केला असून, त्यात गंभीर आरोप केला आहे. 11 ऑगस्ट रोजी सकाळी सासरे लतेश गोयल आणि सून स्नेहा यांच्यात कशावरून तरी वाद झाला. त्याचवेळी स्नेहाने रागाच्या भरात धावत सासऱ्याला 15 फूट उंच बाल्कनीतून ढकलून दिले. त्यानंतर मुलगा हनी त्याच्या जखमी वडिलांना रुग्णालयात घेऊन गेला, परंतु दुसऱ्या दिवशी 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वडिलांचा मृत्यू होण्यापूर्वीच स्नेहाने घरातून सोने-चांदी आणि रोख रक्कम घेऊन पळ काढल्याचे हनीने आपल्या आरोपात म्हटलं आहे. यानंतर त्याचे नातेवाईक घराबाहेर आले आणि भांडण करू लागले. येथे सासरच्या मृत्यूनंतर सुनेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्यामध्ये हुंड्यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
15 फेब्रुवारी 2023 रोजी जयसिंगपुरा येथील नारायण धाम येथील रहिवासी असलेले व्यावसायिक लतेश गोयल यांचा मुलगा हनी गोयल याने त्यांच्या गोडाऊनसमोर राहणाऱ्या स्नेहा डेसोबत प्रेमविवाह केला होता. पण लग्न झाल्यापासून घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे सुरू झाली. याच तणावामुळे वडिलांना दारूचे व्यसन लागले आणि ते घरी न राहता गोडाऊनमध्ये राहू लागले.
10 ऑगस्टच्या रात्रीही ते मद्यपान करून गोडाऊनमध्ये थांबले होते. पण मुलाच्या सल्ल्याने घरी आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा घरात भांडण सुरू झालं आणि सून स्नेहाने सासरच्या मंडळींना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यास सांगितलं आणि भांडण सुरू असताना तिने त्यांना खाली ढकलले. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी स्नेहा विरुद्ध या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हनीने सांगितले की, 2011 मध्ये फतेहपूर सिक्री येथे झालेल्या अपघातात त्याने आई आशा गोयल आणि बहीण निशी यांना गमावले होते. यानंतर दोघे पिता-पुत्र घरात एकत्र राहत होते. जेव्हा हनीने त्याच्या वडिलांना स्नेहा डेवरील प्रेमाविषयी सांगितले तेव्हा त्यांनी लग्नाला संमती दिली जेणेकरून सून येईल आणि घरातील कामे सांभाळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.