राजस्थानच्या जयपूर येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बंगळुरूमधील अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणासारखीच घटना घडली आहे. जयपूरच्या सचिवालयातील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका इंजिनिअरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १४ डिसेंबर रोजी घडली होती, मात्र आता उघडकीस आली आहे. २८ वर्षीय शुभम शर्मा याने महेश नगर सैनी कॉलनी येथील राहत्या घरी आत्महत्या केली आणि सुसाईड नोटही लिहिली.
शुभम शर्माच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने आईची माफी मागितली आणि लिहिलं, "मम्मी, मला माफ कर. मी खूप त्रस्त आहे. मी सर्वकाही नीट करू शकत नाही." दुसरीकडे, शुभमच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्याची पत्नी आणि सासरचे लोक त्याचा सतत छळ करत होते. सासरच्यांनी त्याला मारहाण करण्याची आणि त्याच्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.
शुभमच्या कुटुंबीयांचा मोठा दावा आहे की, त्याला भीती होती की, सासरचे लोक आपल्यासमोर अतुल सुभाषसारखी परिस्थिती निर्माण करू शकतात. या भीतीने त्याने मृत्यूला कवटाळलं. मात्र, या आरोपांची चौकशी सुरू आहे. तपासानंतरच चित्र स्पष्ट होईल.
शुभम हा पाच बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ असून तो मूळचा करौली येथील रहिवासी होता. सध्या तो जयपूरच्या महेश नगर पोलीस स्टेशन परिसरात राहत होता. या आत्महत्या प्रकरणाचा तपास आधीच सुरू होता, मात्र आता या सुसाईड नोटमुळे तपासात नवं वळण आलं आहे. पोलीस शुभम शर्माच्या कुटुंबीयांची चौकशी करणार असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा तपास लवकरच पूर्ण करून शुभम शर्माला न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.