जयपूर - जयपूरमध्ये एका मुलीला कारने चिरडल्याचा खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मंगेश अरोरा याला अटक केली आहे. मंगेशने ज्या मुलीची हत्या केली ती त्याची गर्लफ्रेंड होती. उमा सुथार आणि मंगेश यांचे जुने नाते होते. मात्र याच काळात उमाने राजकुमारला तिचा बॉयफ्रेंड बनवलं, त्यामुळे संतापलेल्या मंगेशने रक्तरंजित सूड घेत दोघांनाही कारने उडवले. या घटनेत उमाचा मृत्यू झाला.
मंगेश अरोरा सोमवारी रात्री ११ वाजता आपल्या नव्या गर्लफ्रेंडसोबत एव्हरग्रीन विश हॉटेलमध्ये पोहोचला. तिथे राजकुमार आणि उमा आधीच बसले होते. राजकुमार हॉटेलच्या छतावर एक रेस्टॉरंट बनवत होता. तेव्हा राजकुमार आणि उमा यांना एकत्र पाहून मंगेशने आक्षेपार्ह कमेंट करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. नंतर मंगेश त्याच्या नव्या गर्लफ्रेंडसोबत दुसऱ्या हॉटेलमध्ये गेला.मध्यरात्री अडीचच्या सुमारास मंगेश त्याची गर्लफ्रेंड आणि दुसरा मित्र गौरवसोबत एव्हरग्रीन विश हॉटेलमध्ये परतला. तिघेही रात्री दारू प्यायले. यादरम्यान मंगेश आणि राजकुमार यांच्यात पुन्हा भांडण झाले. राजकुमारनं त्याला शिवी दिली असं मंगेश म्हणाला. पहाटे पाचच्या सुमारास राजकुमार, उमा यांनी कॅब घेतली आणि हॉटेलमधून बाहेर जात होते. हॉटेलबाहेर कॅबची वाट पाहत असताना मंगेश आणि राजकुमार यांच्यात पुन्हा भांडण झाले. संतप्त झालेल्या मंगेशने कॅबची तोडफोड केली आणि राजकुमारला बेसबॉलच्या स्टिकने मारण्याचा प्रयत्न केला.
मंगेशने पोलिसांना सांगितले की, भांडणानंतर मी गर्लफ्रेंडला सोबत घेत कारमधून निघू लागला. तेव्हा गौरवनं तू नामर्द आहेस का निघून चाललाय असं म्हटलं.गौरवने चिथावणी दिल्याने मंगेशला राग आला आणि त्याने गाडी मागे घेतली आणि नंतर वेगाने गाडी चालवून राजकुमार, उमा यांना धडक दिली.त्यामुळे राजकुमार उडी मारून दूर पडला तर धडकेने उमा रस्त्यावर पडली. डोक्याला मार लागल्याने आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.
उमाच्या हत्येनंतर मंगेश घाबरला. तो ताबडतोब त्याच्या फ्लॅटवर गेला आणि काही पैसे घेऊन त्याचा मित्र जितेंद्रच्या फ्लॅटवर गेला. तिथल्या पार्किंगमध्ये कार उभी केली आणि जितेंद्रच्या गाडीतून अजमेरला पळाला. अजमेरला पोहोचल्यावर जितेंद्रने त्यांना साथ देण्यास नकार दिला म्हणून दोघेही जयपूरला परत आले. मंगळवारी संध्याकाळी मंगेशने टॅक्सी भाड्याने घेतली आणि जयपूरहून हरियाणातील एलेनाबाद या गावासाठी निघाले. पोलिसांनी मंगेशला अटक करण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांच्या घरी छापे टाकले. अटकेसाठी दबाव निर्माण झाल्यावर मंगेशचे वडील हरभजन यांनी मुलगा मंगेशला बोलावून जयपूरमध्ये राहण्यास सांगितले. वडिलांनी त्याला समजावून सांगितले की, त्याने पोलिसांना सरेंडर करावे.सकाळी अकराच्या सुमारास हरभजन मंगेशसोबत मालवीय नगर एसीपी संजय शर्मा यांच्या कार्यालयात पोहोचला आणि आत्मसमर्पण केले, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.