जयपूर: देशातील अनेक प्रसिद्ध हॉटेल्समध्ये सूट-बूट घालून हायटेक चोरी करणाऱ्या चोरालाराजस्थानपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोठ्या हॉटेल्समध्ये आलेल्या व्यापारी किंवा लग्न सोहळ्यात जाऊन हा मोठ्या चोऱ्या करायचा. हा हायप्रोफाईल चोर पूर्ण तयारीनिशी गुन्हे करायचा आणि पसार व्हायचा. मागील अनेक दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर पोलिसांनी जयेश रावजी सेजपाल या हायटेक चोराला अटक केली आहे. हा चोर फक्त दहावी पास आहे, पण तो अतिशय चांगली इंग्रजी बोलू शकतो. जामनगर येथील रहिवासी असलेल्या या आंतरराज्यीय चोराने त्याचा मुंबई कॅटरिंग पार्टनर रमेश भानजी याच्यासोबत गेल्या 20 वर्षांपासून अनेक गुन्हे केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.
फिल्मी स्टाईलमध्ये चोरी करायचा
हा चोर फिल्मी स्टाईलमध्ये चोरीच्या घटना घडवत असे. तो आधी स्वत: एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये मुक्काम करायचा आणि मग तिथे कुणी व्यापारी किंवा डेस्टिनेशन मॅरेज आहे का हे शोधायचा. त्यानंतर हॉटेलमध्ये कोणती खोली रिकामी आहे याची माहिती मिळवण्यासाठी वेटरशी गोड बोलायचा. चोरी झाल्यानंतर तो आपला नंबर बदलून बस किंवा ट्रेनने पळून जायचा.
इंग्रजी बोलून प्रभावित करायचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चोर फक्त दहावी पास आहे, तरीदेखील त्याला अतिशय चांगल्याप्रकारे इंगज्री बोलता येते. तो अस्खलित इंग्रजी बोलून समोरच्या व्यक्तीला इंप्रेस करायचा आणि विश्वास घ्यायचा. तो त्याच्या एका बनावट पॅनकार्डच्या आधारे हॉटेलमध्ये राहायचा आणि त्याच्याकडे एक डमी मोबाइल फोनही ठेवायचा. चालू असलेला मोबाईल फोन फ्लाइट मोडवर ठेवून डमी मोबाईल फोन हातात घेऊन फिरायचा.
या शहरांमध्ये केली चोरीजयेश रावजी सेजपालच्या पोलिस चौकशीत मुंबई, गोंदिया, आग्रा, लखनऊ, विशाखापट्टणम, चेन्नई, जोधपूर, उदयपूर, जयपूर, चंदीगड, जालंधर, कोलकाता, हैदराबाद, कोईम्बतूर, कोची अशा अनेक शहरांमध्ये चोरी केल्याचे उघड झाले आहे. हॉटेल ताज, हयात हॉटेल, रमाडा हॉटेल, क्राउन प्लाझा हॉटेल, नोवोटल हॉटेल, मर्करी हॉटेल, रॅडिसन ब्ल्यू हॉटेल, ट्रायडेंट हॉटेल, क्लार्क आमेर हॉटेल, चंद्रा इन हॉटेल अशा मोठ्या हॉटेलमध्ये तो चोरी करायचा.