लाेकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बिहारच्या सिवान जिल्ह्यातील चार युवक दहशतवाद्यांच्या संपर्कात व देशविरोधी कारवायांत सामील होते, अशी माहिती समोर आली आहे. ‘एनआयए’चे पथक मागील आठवड्यापासून माहिती गोळा करण्याच्या कामी लागले होते. जैश-ए-मोहम्मदशी संलग्न लष्कर-ए-मुस्तफाच्या मदतकर्त्यांचा सध्या शोध सुरू आहे.
एनआयएने सिवानचे पोलीस अधीक्षक शैलेशकुमार सिन्हा यांना पत्र लिहून संशयितांच्या नावांची यादी दिली असून, एसपींनी विविध पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. एसपी कार्यालयाकडून एक पत्र जारी करण्यात आले आहे. यात चार युवकांची नावे आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवणाऱ्यांत त्यांची नावे समोर आली आहेत. हे लष्कर-ए-मुस्तफाचे सक्रिय सदस्य व स्लीपर सेलचा भाग आहेत.
संपूर्ण माहिती मागवली पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस ठाण्यांना पत्र लिहून संशयितांची संपूर्ण माहिती मागवली आहे. संबंधित पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध दाखल असलेले गुन्हे, जप्त केलेले साहित्य, चौकशीत मिळालेली माहिती, गुन्ह्यात दाखल आरोपींची नावे यांबाबत माहिती मागवली आहे. संशयितांचे नातेवाईक कोणाकोणाला भेटतात, याचा तपशील मागविला आहे. संशयितांमध्ये एक हिंदू युवक सामील आहे. गृहमंत्रालयाने पाच दिवसांत या सर्व युवकांचा तपास करून अहवाल मागविला आहे.