विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: लग्नापूर्वी पतीचे ज्या महिलेशी प्रेमसंबंध होते, त्या महिलेने घरी येऊन तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी देत या ‘पतीदेवा’च्या पत्नीला मारहाण केल्याची घटना १४ जुलै रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी १५ जुलै रोजी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या बचावासाठी या पत्नीने पुढाकार घेत महिलेविरुद्ध फिर्याद दिली.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून एका महिलेसोबत प्रेम संबंध होते. मात्र या तरुणाचे लग्न झाल्याने त्याने सदर महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे सदर महिला या तरुणाच्या पत्नीला वारंवार फोन करून शिवीगाळ करीत असे. परिणामी पत्नीने महिलेचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला. तरीदेखील ती महिला दुसऱ्या क्रमांकावरून वारंवार संपर्क साधत शिवीगाळ करते व मानसिक त्रास देत असल्याचे या तरुणाच्या पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे.
यामध्ये १४ जुलै रोजी सदर महिला या तरुणाच्या घरी पोहचली व तुझा पती कोठे आहे, असे तरुणाच्या पत्नीला विचारले. त्याला माझ्याकडे पाठव नाही तर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करीत त्याची नोकरीही खावून टाकेल, तुमची समाजात बदनामी करेल, अशी धमकी दिली. मला पाच लाख रुपये द्या असे म्हणत महिलेने तरुणाच्या पत्नीला मारहाण केली. याप्रकरणी तरुणाच्या पत्नीने सदर महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याची नोंद करण्यात आली आहे.