धुळे : पैसे वाटप करताना जळगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या चार नगरसेवकांना धुळ्यातील मालेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये पकडण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली़ मात्र ते जळगाव येथील भाजपाचे कार्यकर्ते निघाले आणि ते लग्नानिमित्त धुळ्यात आल्याचे चौकशीतून समोर आले़ जिल्हा निवडणूक कार्यालयाचे भरारी पथकाने तपासाअंती त्यांना क्लिन चीट दिली.लोकसभा निवडणूक असल्याने सर्वत्र दक्षतेच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत़ धुळ्यात येणारी बाहेरगावाकडच्या वाहनांकडे देखील बारकाईने लक्ष दिले जात आहे़ मालेगाव रोडवरील मोहाडी पोलीस ठाण्याच्या नजिक असलेल्या हॉटेल गौरववर जळगाव येथील भारतीय जनता पार्टीचे चार नगरसेवक पैसे वाटपाच्या उद्देशाने आले असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली़ माहिती मिळताच पथकाने हॉटेलवर धाड टाकली़ या ठिकाणी जळगावचे चार जण आले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांची वाहने, बॅगा आणि ते ज्या रुममध्ये उतरले होते त्याची तपासणी करण्यात आली़ चौकशीअंती ते जळगाव येथील भाजपा कार्यकर्ते होते. ते सर्व साक्री रोडवरील कुमारनगरात एका लग्नासाठी आल्याचे स्पष्ट झाले. मोबाईलवर पत्रिका देखील दाखविली़ मिळालेल्या माहितीनुसार लग्न असल्याची पथकातील काही सदस्यांनी खातरजमा देखील केली़ ती खरी ठरली़ शिवाय या चौघांकडे दारु आढळली़ मात्र, त्यांच्याकडे वैयक्तिक दारु पिण्याचा परवाना असल्याचेही चौकशीतून समोर आले़ अनेकांनी घटनास्थळी धाव देखील घेतली होती़ मात्र ही चर्चाच ठरली.दरम्यान, सोशल मीडियातून मात्र पैसे वाटप करण्यासाठी आलेल्या चौघांची माहिती अतिशय वेगात व्हायरल झाली़ तपासणीअंती ही निव्वळ अफवाच ठरली़चार जणांना एका हॉटेलमधून पकडण्यात आले़ चौकशीअंती ते लग्नानिमित्त आल्याचे समोर आले़ पैसे वाटपाची निव्वळ अफवा आहे़ पोलिसांनी नाहीतर भरारी पथकाने ही कामगिरी केली आहे़ त्यांची चौकशी पथकाने केली आहे़ त्यांना काही संशयास्पद वाटल्यास, त्यांनी तक्रार दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल़- अभिषेक पाटीलसहायक पोलीस निरीक्षक
जळगावच्या नगरसेवकांना पकडल्याची अफवाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 8:43 PM