मुक्ताईनगर जि.जळगाव : भुसावळपाठोपाठ मुक्ताईनगर येथेही तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. सासरी मुक्कामी आलेल्या मेहुण्याने २१ वर्षीय विशालच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृणपणे खून केला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता शहरातील पशुवैद्यकीय चिकित्सालय शेजारील इमारतीत उघडकीस आली.
तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विशाल वामन ठोसरे या तरुणासाठी गुरुवारची रात्र काळरात्र ठरली. गेल्या तीन दिवसांपासून सासरी मुक्कामी आलेला त्याचा मेहुणा विजय चैत्राम सावकारे (रा. चुंचाळे ता. यावल) याने शालक विशाल झोपेत असतांना डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृणपणे खून केल्याचा संशय आहे. या घटनेनंतर संशयित मेहुणा फरार झाला आहे. गुरुवारी जावयासाठी पाहुणचार केल्यानंतर विशाल ठोसरे आणि मेहुणा विजय सावकारे वरच्या मजल्यावर झोपायला गेले. रात्री दोघे एकाच खोलीत झोपले. मात्र सकाळी विशालचा मृतदेह आढळून आला तर मेहुणा येथून पसार झाल्याचे दिसून आले. दरम्यान, माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले आहेत.