जितेंद्र कालेकर -
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील शेख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधाराचा अद्यापही शोध सुरूच आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक यातील मुख्य संशयित आरोपी ओसामा याच्या शोधासाठी उत्तर प्रदेशात अलीकडेच रवाना झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी शेख यांच्यावर २३ नोव्हेंबर २०२० रोजी गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. याच हत्या प्रकरणातील शाहिद शेख या आरोपीला २५ नोव्हेंबर २०२० रोजी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने भिवंडीतील पडघा येथून अटक केली होती. ज्या मोटारसायकलीवरून तो पळाला होता, ती मोटारसायकल पडघ्यातच मिळाली होती. त्याच भागातील एका गटारात या मोटारसायकलीची नंबर प्लेटही पोलिसांना मिळाली होती. नंतर ठाणे खंडणी विरोधीपथक तसेच युनिट एकच्या पथकाने याच मोटारसायकलीवरून गोळी झाडणारा इरफान शेख (२१) याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो वारंवार हुलकावणी देत होता. अखेर उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलातील (एसटीएफ) पोलीस निरीक्षक सत्यप्रकाश सिंग आणि उपनिरीक्षक सूरज सिंग या पथकाच्या मदतीने ३ एप्रिल २०२१ रोजी इरफान याला ठाण्याच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी अटक केली होती.इरफानला ओसामा याने या हत्येसाठी दोन लाखांची सुपारी दिल्याचे एसटीएफच्या चौकशीत समोर आले. याच चौकशीमध्ये ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांचाही उल्लेख एसटीएफने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. त्यामुळे हल्ल्यानंतर पुन्हा राबोडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमीलचे नातेवाईक आणि मनसेने सुरुवातीलाच मुल्ला यांच्यावर संशय व्यक्त केला होता. मूळात, हत्येची सुपारी देणारा ओसामा हाती न लागल्यामुळे या हत्येतील मारेकरी आणि सूत्रधार यांच्या साखळीचा छडा अजूनही पोलिसांना लावता आलेला नाही. आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यावेळीही मुल्ला यांनी स्पष्ट केले होते.
पोलिसांना दिली हुलकावणी -- उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि सिद्धार्थनगर (नवगड) या भागात ओसामा असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाण्यातून युनिट एकचे एक पथक ३१ जानेवारी २०२२ रोजी पुन्हा गोरखपूरला रवाना झाले. - मात्र, त्याने हुलकावणी दिल्यामुळे या पथकाने सध्या याच भागात मुक्काम ठोकला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला लवकरच पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.