काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. हंदवाडा पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलिसाने एका मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. परंतू तिथे मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दुसऱ्या पोलिसांनी त्याला दहशतवादी समजून गोळ्या झाडल्या. यामध्ये या पोलिसाचा मृत्यू झाला आहे. (Police died in firing by police on duty at Jammu kashmir.)
अजय धर असे या पोलिसाचे नाव आहे. मंगळवारी रात्री उशिरा तो जबरदस्तीने मंदिरात जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसाने त्याला तीन-चार वेळा थांबण्याचा इशारा दिला तसेच हटकले. परंतू अजयच्या कानात हेडफोन असल्याने त्याला ऐकू आले नाही. यामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाला तो दहशतवादी असेल असे वाटले. तसेच हल्ला करण्यासाठी मंदिरात घुसत आहे असे वाटले. यामुळे संरक्षणासाठी त्याने त्याच्यावर गोळी झाडली.
अजय खाली पडताच त्याला पोलिसांनी घेरले असता तो आपलाच पोलीस कर्मचारी असल्याचे लक्षात आले. तातडीने अजयला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतू, त्याचा मृत्यू झाला. उत्तर काश्मीरचे डीआयजी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला त्याच्या वागण्यामुळे दहशतवादी समजून गोळी झाडली, यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.