मुंबई - ब्रीच कॅन्डी या उच्चभ्रू परिसरातील एका घरी जेवण बनवणाऱ्याने मेहुणीच्या १७ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर रक्तस्त्राव झाल्यानंतर मासिक पाळीचे कारण पुढे करत या भामट्याने जसलोक रुग्णालयात तिला दाखल केले. मात्र, सतर्क डॉक्टराला काही संशयास्पद आढळून आलं आणि तपासणीदरम्यान तिच्यावर लैंगिक शोषण झाल्याचे कळाल्याने डॉक्टरने गावदेवी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर भामट्याला गावदेवी पोलिसांनी गजाआड केले. आरोपीचे नाव उदय पाल (वय 47) असं असून त्याला १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंग पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
ही दुर्दैवी घटना २७ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळच्या सुमारास ब्रीच कॅन्डी परिसरात घडली होती. मूळचा पश्चिम बंगालचा असलेला उदय पाल व त्याचे कुटुंबीय उच्चभ्रू लोकांकडे घरकाम करण्याचे काम करतात. ब्रीच कॅन्डी येथील एका इमारतीत राहणाऱ्या वयोवृद्ध बहिणींकडे उदय जेवण बनवण्याचे काम करतो. तेथेच घरकामासाठी महिन्याभरापूर्वी पश्चिम बंगाल येथून मेहुणीची १७ वर्षीय मुलीला घेऊन आला होता. मात्र, त्याचं यामागे दुष्कृत्य दडलं होतं. मुंबईत घेऊन आलेल्या मेहुणीच्या मुलीवर उदय वारंवार विनयभंग करत होता. ज्यांच्या घरी जेवण बनविण्याचे काम करत होता त्या घराच्या मालकीणी असलेल्या वयोवृद्ध बहिणी २७ ऑक्टोबरला न्यूयॉर्कला गेल्या. याच संधीचा फायदा घेत उदयने डाव साधला. घरातले काम संपविल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी आंघोळीला गेली. त्यावेळी उदय जबरदस्तीने बाथरूममध्ये शिरला आणि बळजबरीने त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने उदय मेहुणीच्या मुलीला घेऊन जसलोक रुग्णालयात गेला. मासिक पाळीमुळे तिला त्रास होत असल्याचे त्याने डॉक्टरांना खोटी बतावणी केली.मात्र, मुलीची अवस्था पाहून डॉक्टरांनी तात्काळ गावदेवी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, महिला पोलिसांनीपीडित मुलीकडे सखोल चौकशी केली असता तिने सर्व हकीगत सांगितली. या प्रकरणी भा. दं. वि. कलम ३७६ सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) कलम ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल करून उदय पालला अटक केली.