सातारा : एका आठ वर्षे वयाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिला चालत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार आदर्की ते वाठार स्टेशनदरम्यान सोमवारी मध्यरात्री दीड वाजता घडला. यामध्ये मुलगी जखमी झाली आहे. संशयितास रेल्वे पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली असून, प्रभू मल्लाप्पा उपहार (३३, जि. बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. आरोपी हा सैन्य दलात झांसी येथे कार्यरत आहे.याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस सोमवारी रात्री दीड वाजता साताऱ्यापासून पुढे लोणंदला गेली. या रेल्वेच्या एस-७ डब्यात एक कुटुंब प्रवास करीत होते. रात्री जेवण झाल्यानंतर मुलगी बर्थवर झोपली होती. संशयिताने मुलीला झोपेतच उचलून बाथरूममध्ये नेले. बाथरूममध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असतानाच मुलीला जाग आली. तिने आरडाओरडा सुरू केला. तिने आरोपीला लाथा मारल्या. लाथा मारल्यानंतर आरोपीने मुलीला रडू नको, आई-वडिलांकडे सोडतो, असे सांगितले व तिला बाथरूमच्या बाहेर घेऊन आला. यानंतर संशयिताने अचानक दरवाजा उघडून मुलीला ट्रेनच्या बाहेर फेकून दिले.याचवेळी ट्रेनचा वेग ताशी २० कि.मी. इतका कमी होता. त्यामुळे मुलगी ट्रेनमधून पडली तरी तिला गंभीर इजा झाली नाही. स्थानिकांनी जेव्हा तिला रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिने खरी हकिकत सांगितली. ही माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने हालचाल करत रेल्वेच्या बोगी पूर्णपणे ब्लॉक केल्या. मुलीने दिलेल्या वर्णनानुसार जवळपास २५ व्यक्तींची पोलिसांकडून पडताळणी करण्यात आली. त्यातून चार जणांना ताब्यात घेतले. या चौघांतून मूळ संशयिताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
धक्कादायक! जवानाने धावत्या ट्रेनमधून अल्पवयीन मुलीला फेकलं; अतिप्रसंगास विरोध केल्यानं कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 8:54 AM