नवी दिल्ली - बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुण वयात लखपती होण्याच्या हव्यासापोटी एका तरुणीने हजारो रुपये गमावले आहेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने घरातील सदस्यांपासून वाचण्यासाठी खोटी गोष्ट रचली. हे प्रकरण स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर प्रथम अधिकारीही चक्रावले, मात्र तपास सुरू होताच हा अजब प्रकार समोर आला. लखपती होण्याच्या हव्यासापोटी ही तरुणी आर्थिक फसवणुकीची बळी ठरली.
मिळालेल्या माहितीनुसार, जहानाबाद शहरातील रामनगर-विशुनगंज मोहल्ला येथे राहणारी अंजली कुमारी ही फसवणूक करणाऱ्या टोळीची शिकार झाली. 25 लाख रुपये मिळवण्याच्या लोभापायी तरुणीने तब्बल 70 हजार रुपये गमावले. पैसे न मिळाल्याने निराश झालेल्या अंजलीला आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने आई व भावाच्या भीतीने 70 हजार रुपये चोरीला गेल्याचं नाटक केलं. पोलीस अधिकारी निखिल कुमार यांनी तपास केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांच्या चौकशीत अंजलीने खोटारडेपणाची कबुली दिली आणि चोरीचं नाटक केल्याचं सांगितलं.
शहरातील रुग्णालयाजवळील रस्त्यावर दुचाकीस्वारांनी 70 हजार रुपये लुटल्याचं सांगत अंजली कुमारी रस्त्याच्या मधोमध रडू लागली. लोकांनी विचारणा केली असता तिने पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करणार असल्याचं सांगितलं. याबाबतची माहिती शहर पोलीस ठाण्याला मिळाली. यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आणि तरुणीच्या घरी जाऊन या प्रकरणाचा तपास केला. घटनास्थळाजवळ स्नॅचिंगच्या घटनेबाबत कोणीही माहिती दिली नाही. पोलिसांनी मुलीची कसून चौकशी सुरू केली असता अंजलीने खरा प्रकार सांगितला.
अंजलीच्या आत्याचे 20 हजार रुपये आणि आई-भावाचे 50 हजार रुपये घरात ठेवले होते. घरात पैसे असल्याची माहिती अंजलीलाही होती. वास्तविक, काही दिवसांपूर्वी तरुणीच्या मोबाईलवर एका नंबरवरून व्हॉट्सएप कॉल आला होता, ज्यामध्ये फसवणूक करणाऱ्याने तुम्हाला 25 लाखांचे बक्षीस दिले आहे. यामुळे अंजलीला खूप आनंद झाला. कॉलरने खाते क्रमांक दिला आणि त्यावर 50 हजार रुपये जमा करून 25 लाख रुपये अंजलीच्या खात्यात जमा करण्याचं सांगितलं. अंजलीने काहीही विचार न करता घरात ठेवलेले 50 हजार रुपये घेऊन कॅनरा बँक गाठली आणि दिलेल्या खात्यात पैसे जमा केले.
भामट्याने पुन्हा अंजलीला कॉल करून 20 हजार रुपये पाठवल्यावर बक्षिसाची रक्कम 25 लाख मिळतील असं सांगितलं. तरुणीने पुन्हा त्याच्या जाळ्यात अडकून घरात ठेवलेले 20 हजार रुपये फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात टाकले. आपली फसवणूक झाल्याचे पूर्ण लक्षात आल्यावर घरच्यांची भीती वाटली. आई, भाऊ आणि आत्याच्या भीतीपोटी नवा कट रचला आणि पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करण्यासाठी जात असताना 70 हजार रुपये लुटल्याची घटना घडली असं सांगितलं. पण पोलिसांनी तपास करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.