नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल, त्यांचे कुटुंब आणि इतरांविरुद्ध चौकशी केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जेट एअरवेज इंडिया लिमिटेड (जेआयएल) ची ५३८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये विविध कंपन्या आणि व्यक्तींच्या नावे १७ निवासी फ्लॅट-बंगले आणि व्यावसायिक जागेचा समावेश आहे. जप्त केलेल्या काही मालमत्ता जेआयएलचे संस्थापक नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल यांच्या नावे लंडन, दुबई आणि भारतातील विविध राज्यांमध्ये आहेत. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीने कॅनरा बँकेच्या ५३८ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली होती.
ईडीने २ महिन्यांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नरेश गोयल यांना अटक केली होती. त्यांच्यावर ५३८ कोटींच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप आहे. मंगळवारी ईडीने या प्रकरणी गोयल त्यांची पत्नी आणि अन्य लोकांवर आरोपपत्र दाखल केले होते. तपासावेळी ईडीला जेआयएलने कॅनरा बँक आणि पीएनबीसह एसबीआय बँकेकडून कर्ज घेतल्याचे उघड झाले.
काय आहे प्रकरण?
नरेश गोयल आणि इतरांविरुद्ध ईडीने फसवणुकीचा नवीन गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच गोयल यांच्या मुंबई आणि दिल्लीतील आठ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. ५३८ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी छापा टाकल्यानंतर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. सीबीआयनं आपल्या तपासात गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि जेट एअरवेजचे माजी संचालक गौरांग आनंद शेट्टी यांना आरोपी केलं. कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून तपास यंत्रणेनं नवीन गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीत, कॅनरा बँकेनं आरोप केला होता की त्यांनी जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडला (जेआयएल) ८४८.८६ कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं होते, त्यापैकी ५३८.६२ कोटी रुपये थकित आहेत.
अनेक प्रकरणांचा तपास
एकेकाळी देशातील सर्वात मोठी खाजगी विमान कंपनी असलेली जेट एअरलाइन्स एप्रिल २०१९ मध्ये मोठ्या कर्जामुळे आणि रोखीच्या तुटवड्यामुळे बंद पडली. संयुक्त अरब अमिरातीचे व्यापारी मुरारी लाल जालान आणि लंडनस्थित कंपनी कार्लरॉक कॅपिटल यांच्या एका कन्सोर्टियमनं जून २०२१ मध्ये जेट एअरलाईन्स दिवाळखोरी प्रक्रियेत विकत घेतली. तेव्हापासून विमान कंपनीच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू आहे. जेट एअरवेज वादात सापडल्यापासून अनेक एजन्सी त्यांच्या कारभाराची चौकशी करत आहेत. यामध्ये ईडी, सीबीआय, आयकर आणि एसएफआयओ यांचा समावेश आहे.