मुंबई - जेट एअरवेज कंपनी आर्थिक डबघाईस आली असतानाही खोटी माहिती व आमिष दाखवून एका व्यावसायिकाची ४६ कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे कार्यकारी संचालक नरेश गोयल व त्यांची पत्नी अनिता नरेश गोयल यांच्याविरुद्ध एम.आर.ए.मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र शंकरन नेदुपरमलिल (५५) यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरुन फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
राजेंद्र यांची अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया नावाची प्रवासी कंपनी आहे. त्यांना नरेश गोयल यांनी जेट एअरवेज ही हवाई कंपनी तोट्यात असल्याने बंद पडण्याच्या अवस्थेत होती, मात्र आपल्याला बनावट कागदपत्रे दाखवून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून २०१८ ते २०१९ या वर्षामध्ये व्यवसाय करण्यासाठी तब्बल ४६ कोटी ५ लाख ६८०३६ रुपयांची गुंतवणूक करुन घेतली. मिळालेली रक्कम परदेशातील बँक खात्यावर वर्ग केली. मात्र त्याची परतफेड करण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे नरेश व त्यांची पत्नी अनिता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबतचा अर्ज पोलीस आयुक्तांकडे दिला होता. आर्थिक व्यवहार सीएसएमटी स्टेशन परिसरातील कार्यालयात झाल्याने त्याबाबत एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याप्रमाणे अन्य व्यावसायिकांचीही मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.