अलिबाग :
रोज एकाच रस्त्याने येणाऱ्या सोने व्यापाऱ्याला लुटण्याच्या इराद्याने त्याला जिवे मारण्याची घटना शनिवारी ३ डिसेंबर २०२२ रोजी नेरळ कशेळे रस्त्यावर जिते गावाच्या हद्दीत घडली होती. या घटनेत ठाकुर्ली येथील राजेंद्र ज्वेलर्स व्यवसायिक हरिष उर्फ हरिसिंग माधो सिंग राजपूत (३८) याची हत्या झाली होती. या गुन्ह्यातील सहा आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ३६ तासात आवळल्या आहेत. आरोपींना १९ डिसेंबर पर्यंत न्यायलयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. स्थानिक गुन्हे पथकाने तांत्रिक दृष्ट्या, सीडीआर आणि सी सी टिव्ही च्या माध्यमातून गुन्ह्याचा यशस्वी तपास लावला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
हरिष राजपूत यांचे नेरळ मध्ये कशेळे येथे राजेंद्र ज्वेलर्स दुकान आहे. हरिष हे रोज सायंकाळी दुकान बंद करून कशेळे वरून नेरळ रेल्वे स्टेशन जवळ मोटार सायकल ठेवून ठाकुर्ली येथे आपल्या घरी रेल्वेने जात असत. हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. ३ डिसेंबर रोजी नेहमी प्रमाणे ते घरी जाण्यास निघाले असता पाळतीवर असलेल्या आरोपींनी नेरळ कशेळे रस्त्यावर जिते गावाच्या हद्दीत हरिष यांना अडवून त्याची हत्या करून त्याच्याकडील बॅग, मोबाईल घेऊन पसार झाले. पती वेळेत घरी न आल्याने त्याच्या पत्नीने नेरळ पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी रस्त्यावर शोध घेतला असता जिते गावाच्या हद्दीत हरिष यांचा गवतात मृतदेह पडलेला दिसला. त्यानुसार नेरळ पोलिसांनी ४ डिसेंबर रोजी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघडकीस आणण्यासाठी चार पथक तयार केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे आणि त्याच्या पथकाने विविध पद्धतीने गुन्ह्याचा तपास सुरू केला. तांत्रिक दृष्ट्या सी डी आर आणि सीसीटिव्हीच्या माध्यमातून योग्य तपास करून पथक आरोपी पर्यंत पोहचले. यामध्ये मुख्य आरोपी छगनाराम पटेल, जनार्दन कराळे, रोशन धुळे, सनी गिरी, सूरज जाधव, तानाजी चौगुले या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सहाही आरोपींना १९ डिसेंबर पर्यंत न्यायलयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी ३६ तासात गुन्ह्याचा छडा लावला आहे.
लुटण्याच्या इराद्याने व्यापाऱ्यांचा गेला नाहक बळी
हरिष हे घरी जाताना बॅगेतून सोने नेत असणार अशी शंका या आरोपींना होती. कशेळे येथील जनार्दन कराळे यांनी हरिष यांच्याकडून चैन खरेदी केली होती. त्याचे पैसेही त्यांनी दिले नव्हते. त्यामुळे हरिष यांना लुटण्यासाठी आणि आपले पैसे ही वाचतील या इराद्याने कराळे आणि धुळे यांनी पटेल यांना टीप दिली होती. पटेल याचे तीन साथीदार तसेच कराळे आणि धुळे यांनी योजना आखून हा गुन्हा केला.