सातारा : खेड, ता. सातारा येथील वनवासवाडीतील दिवंगत निवृत्त डीवायएसपी बाजीराव कदम यांच्या बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख ६५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना दि. ८ ते २२ एप्रिल या कालावधीत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निवृत्त डीवायएसपी बाजीराव कदम यांचे गेल्या वर्षी निधन झाले आहे. त्यांची पत्नी मंगल कदम (वय ७४) या एकट्याच बंगल्यात राहतात. तर त्यांच्या दोन्ही मुली पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या बंगल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून काम सुरू आहे. या कामासाठी काही कामगार त्यांच्या बंगल्यामध्ये येत होते.
८ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत बेडरुममधील लोखंडी कपाटाच्या उघड्या असलेल्या लाॅकरमधून चोरट्यांनी दोन लाख ६५ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरून नेले. यामध्ये सोन्याची चेन, देवीचा पेन्डंट, पुष्कर स्टोनचे पेन्डट, सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याची अंगठी, चांदीचे ब्रेसलेट तसेच सोन्या-चांदीचे दागिन्यांचा समावेश होता.
ही चोरी झाल्याचे समजताच त्यांच्या पुण्यातील मुली साताऱ्यात आल्या. बंगल्यात काम करणाऱ्या कामगारांनी तर ही चोरी केली नाही ना, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले आहे. हे पथक आता सर्व शक्यता गृहीत धरून तपास करणार आहेत. घरात काम करणाऱ्या मोलकरणीलाही पोलिस चाैकशीला बोलविणार आहेत. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस नाईक बाबासो भिसे हे अधिक तपास करीत आहेत.