पिंपरी : सराफावर गोळीबार करत चार चोरट्यांनी सराफी पेढीतून सोन्या-चांदिचे दागिने लुटून नेले. रहाटणीतील कोकणे चौक परिसरात शिवराजनगर येथे बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली.दिव्यांक प्रदीप मेहता (वय २५, रा. आर्यविधान अपार्टमेंट, साई कॉलनीजवळ, रहाटणी) असे गोळीबारात जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. तसेच सराफी दुकानातील कामगार मोनाली नवनाथ कंधारे (वय ३८) यांनाही चोरट्यांनी दुखापत केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणीतील कोकणे चौक परिसरात शिवराज नगर येथे आकाशंगा हाउसिंक सोसायटीजवळ शिवराज गार्डन समोर पुणेकर ज्वेलर्स ही सराफी पेढी आहे. दिव्यांक मेहता यांच्या मालकीची ही पेढी आहे. बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास दिव्यांक मेहता आणि कंधारे सराफी पेढीत होते. त्यावेळी चार चोरटे दुकानात आले. त्यांनी दुकानाचे शटर आतून बंद केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दिव्यांक मेहता आणि मोनाली कंधारे गोंधळले. त्यांनी चोरट्यांना प्रतिकार केला. यात चोरट्यांनी दिव्यांक यांच्या उजव्या पायावर गोळी मारली. तसेच मोनाली कंधारे यांनी त्यांच्या फोनवरून फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हातातील फोन हिसकावून घेत चोरट्यांनी तो फोन फोडला. तसेच दुकानातील साहित्याची तोडफोड केली. तसेच सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी लुटून नेले. पुणेकर ज्वेलर्स या सराफी पेढीलगत अनेक दुकाने आहेत. असे असतानाही चोरट्यांनी अचानक लूटमार करीत लाखोंचा ऐवज लुटून नेला. ही बाब लक्षात येताच काही नागरिकांनी दिव्यांक यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. दिव्यांक यांचे कुटुंबिय आणि काही नागरिकांनी मेहता आणि मोनाली कंधारे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
पुणेकर ज्वेलर्सच्या शाखेतील दुसरा प्रकारदिव्यांक मेहता आणि त्यांचे वडील प्रदीप मेहता यांच्या मालकीच्या पुणेकर ज्वेलर्स या सराफी पेढीच्या दोन शाखा आहेत. मूळ शाखा रहाटणीतील बळीराज मंगल कार्यालयासमोर आहे. रहाटणीतील शिवराजनगर येथे सुमारे वर्षभरापूर्वी पुणेकर ज्वेलर्स यांची दुसरी शाखा सुरू करण्यात आली. मूळ शाखा असलेल्या रहाटणीतील बळीराज मंगल कार्यालयासमोरील पुणेकर ज्वेलर्सच्या दुकानात वर्षभरापूर्वी चोरी झाली होती. चोरट्यांनी रात्री दुकान फोडून ऐवज लंपास केला होता.