लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : येथील ज्वेलर्स व्यावसायिक सुरेश सोनी यांनी ऑक्टोबरमध्ये १९१९ गॅम सोन्याचे एक कोटी पाच लाख ५४ हजार रुपये किमतीचे दागिने ठाण्यातील सुरेशकुमार जैन या सराफाकडे सफाई आणि कलाकुसरसाठी दिले होते.
सराफाने दागिने मूळ मालकाला अंधारात ठेवून परस्पर मुंबईतील सराफ राजेश जैन याच्याकडे गहाण ठेवून त्या बदल्यात ५० लाख रुपये घेतले. या दोन्ही सराफांनी सोनी यांना सोन्याचे दागिने किंवा त्या बदल्यात पैसे देण्याचे नाकारल्याने मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
सोनी त्यांच्या ज्वेलर्समधील दागिने नेहमी ठाण्यातील सुरेशकुमार जैन यांच्याकडे सफाई आणि कलाकुसरसाठी द्यायचे. ऑक्टोबरमध्ये सोनी यांनी नेहमीप्रमाणे सोन्याचे दागिने सुरेशकुमार यांच्या ताब्यात दिले होते. महिनाभरात दागिने परत देतो, असे त्यांनी सोनी यांना सांगितले. अनेक दिवस उलटूनही दागिने परत करत नाहीत म्हणून सोनी यांनी दागिने परत करण्याचा तगादा लावला. यावर सुरेशकुमार यांनी आपले वडील आजारी आहेत. रुग्णालयात जावे लागते, अशी कारणे देत दागिने देण्यास टाळाटाळ केली.
दागिने ६ महिन्यांसाठी गहाण ठेवले आणि... दरम्यानच्या काळात सुरेशकुमार यांनी सोनी यांना न सांगता त्यांचे सोन्याचे दागिने मुंबईतील राजेश जैन या विक्री व्यवस्थापकाकडे सहा महिन्यांसाठी गहाण ठेवले. त्या बदल्यात सुरेशकुमार यांनी राजेश यांच्याकडून ५० लाख रुपये घेतले. सहा महिने उलटून सुरेशकुमार दागिने सोडविण्यासाठी येत नाहीत म्हणून राजेश यांनी सुरेशकुमार यांची वाट न पाहता ते दागिने मोडून टाकले. सोनी यांनी सुरेशकुमार यांच्याकडे दागिने परत करण्याची मागणी लावून धरली. त्यावेळी त्यांनी आर्थिक अडचणीमुळे आपण दागिने राजेश यांच्याकडे गहाण ठेवल्याचे सांगितले. राजेश यांच्याकडे चौकशी करता त्यांनी आपण दागिने मोडले असल्याचे त्यांना सांगितले. परत देतो असे सांगितले, मात्र दिले नाहीत.