Robbery News: राजधानी दिल्लीतून जबरी चोरीची मोठी घटना समोर आली आहे. भोगल भागात असलेल्या उमराव ज्वेलर्समध्ये रात्री उशिरा 25 कोटी रुपयांचां दरोडा पडला. चोरट्यांनी दुकानाचे छत फोडून शोरुमच्या स्ट्राँग रुममध्ये प्रवेश केला आणि दागिने लुटले. रविवारी ही चोरी झाल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या निजामुद्दीन पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची छाननी करण्यात येत आहे.
शोरुम मालकाच्या म्हणण्यानुसार सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांची चोरी झाली आहे. रविवारी त्यांनी दुकान बंद करेपर्यंत काहीही संशयास्पद वाटले नाही. सोमवारी शोरुम बंद ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी शोरुम उघडले तेव्हा सगळेच चक्रावून गेले. स्ट्राँग रुमजवळील भिंत आणि छत फोडल्याचे दिसले. हा दरोडा अतिशय शांतपणे पार पाडला, ज्यामुळे कुणालाही काही संशय आला नाही.
चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या बहुतांश मौल्यवान वस्तू पळवून नेल्या आहेत. शोरुम मालकाने सांगितले की, किती माल गमवावा लागला, याचा हिशेब अद्याप लावता आला नाही, पण 20 ते 25 कोटी रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा अंदाज आहे. पोलीस सध्या शोरुममध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. याशिवाय आजूबाजूचे लोक आणि शोरुमच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.