नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. झाशीमध्ये कुटुंबाच्या मर्जीविरोधात आंतरधर्मीय विवाह केलेल्या एका विवाहितेचा गूढ मृत्यू (Death) झाला आहे. संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अफरोज उर्फ निलम असं या महिलेचं नाव असून तिच्या माहेरच्या मंडळींनी हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्या विवाहितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी या महिलेचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या छतरपूरची रहिवासी असलेल्या निलम अहिरवारने तब्बू उर्फ तालिबसोबत सहा वर्षांपूर्वी आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यानंतर निलमचं नाव हे अफरोज बेगम असं झालं. सहा जुलै रोजी अचानक तिची तब्येत बिघडली. उपचारासाठी घेऊन जात असताना झाशीजवळ तिचा मृत्यू झाला. त्यामुळे झाशीच्या प्रेमनगरमधील कब्रिस्तानात अफरोजला दफन करण्यात आलं. आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. तसेच याबाबत छतरपूर पोलिसांत देखील तक्रार दाखल केली आहे.
कुटुंबाचा विरोध असतानाही आंतरधर्मीय विवाह केलेल्या अफरोजचा काही दिवसांपूर्वी गूढ मृत्यू झाला. अफरोजची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या आरोपानंतर तिच्या मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी 11 दिवसांनी तिचा मृतदेह कबरीबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे शवविच्छेदन केले जाणार आहे. यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज तकने याबाबतचे वृत्त दिले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली आहे.
प्रशासनाच्या परवानगीने कडक सुरक्षेत प्रेमनगर कब्रस्तानात दफन केलेला अफरोजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर आता या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करणार आहे. एसडीएम ज्युडीशिअल अतुल कुमार यांच्यासह मध्य प्रदेश पोलिसांच्या उपस्थितीत हा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला. अतुल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पतीने तिचा दफनविधी केला. झाशीच्या जिल्हाधिकारी आंद्रा वामसी यांच्या आदेशानुसार, प्रेमनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या उपस्थितीत कबरीतून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदन केले जाणार आहे.