झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात होळीच्या दिवशी संध्याकाळी मैत्रिणींना रंग लावण्यासाठी गेलेल्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. गोविंदपूर गावातील एका शेतात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची 17 वर्षांची मुलगी होळीच्या संध्याकाळी रंग लावण्यासाठी मैत्रिणीच्या घरी जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. मात्र रात्रीपर्यंत ती घरी न परतल्याने तिचा शोध सुरू होता. मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो स्वीच ऑफ सांगत होता. यानंतर खूप शोध घेतला, पण तिचा कुठेच शोध लागला नाही. यानंतर घटनेची माहिती महागमा पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी रात्रभर शोध घेतला, मात्र मुलगी सापडली नाही. गुरुवारी सकाळी गोविंदपूर टेकडीजवळ एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती कोणीतरी दिली. त्यानंतर पोलिसांसह आलेल्या कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली. एसडीपीओ महागामा शिव शंकर तिवारी आणि स्टेशन प्रभारी मुकेश कुमार सिंह यांनी एका टीमसह घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी गोड्डा रुग्णालयात पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला.
मुलीचे वडील ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या राजमहल प्रकल्पात डंपर ऑपरेटर म्हणून नोकरीला असून ऊर्जानगर निवासी वसाहतीत कुटुंबासह राहतात. याबाबत पोलीस अधीक्षक (एसपी) नाथू सिंह मीना यांनी सांगितले की, मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत त्यामुळे तिची हत्या झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"