झारखंडमधील एका बाजारातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बाजारात रविवारी बाईकच्या डिक्कीमध्ये बॉम्बचा स्फोट झाला. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. एक व्यक्ती बाईकमध्ये स्फोटके घेऊन बाजारामध्ये भाजी घेण्यासाठी गेला होता, यावेळी स्फोट झाला. या स्फोटात तीन भाजी विक्रेते आणि अन्य एक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.
जखमींना शहरातील शहीद निर्मल महातो वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसर सील केला.
ही घटना टोपचांची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष चौकात घडली आहे. येथे रविवारी दुपारी गोमो येथील रहिवासी पिंकू हा त्याच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये स्फोटके घेऊन फिरत होता. यादरम्यान हा तरुण भाजी मंडईत भाजी घेण्यासाठी दाखल झाला. त्यानंतर त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने घटनास्थळी भीतीचे वातावरण झाले. याबरोबर अनेक दुकानांचेही नुकसान झाले. या स्फोटात तीन भाजी विक्रेते आणि अन्य एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
धक्कादायक! थंडीपासून वाचण्यासाठी पेट्रोमॅक्स पेटवली, विषारी वायूमुळे दाम्पत्य आणि दोन मुलांचा मृत्यू
स्फोटानंतर स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरुण स्फोटके घेऊन खुलेआम फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनीही गस्त वाढवली आहे. संशयितांवर बारीक नजर ठेवली जात आहे. पोलिसांकडूनही तपासणी मोहीम राबवली जात आहे.
सर्व जखमींना शहीद निर्मल महतो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.