Jharkhand Crime:झारखंडच्या दुमका येथे सामूहिक बलात्काराची बळी ठरलेली स्पेनमधील 28 वर्षीय स्पॅनिश महिला आपल्या पुढील प्रवासासाठी पतीसोबत झारखंडवरुन नेपाळला रवाना झाली. पीडितेने या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाने तातडीने कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच सर्व आरोपींना अटक झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कडेकोट बंदोबस्तात या स्पॅनिश जोडप्याला झारखंडच्या दुमका येथून बाहेर काढण्यात आले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पीडितेने सांगितले की, भारतातील लोक चांगले आहेत, पण माझा राग फक्त दोषींवर आहे. आयुष्यात घटना घडत राहतात, पण आपला प्रवास सुरुच असतो. माझा प्रवासही माझ्या पूर्वनियोजित मार्गाने सुरू राहील. पीडित महिला आणि तिच्या पतीला आज कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दुमकातून दुचाकीने बिहारमधील भागलपूरला निघाले. भागलपूरहून दोघेही नेपाळला रवाना होतील.
महिलेसोबत काय घडले? आपल्या पतीसोबत दुचाकीने विविध देश फिरायला निघालेली स्पॅनिश महिला झारखंडच्या दुमका शुक्रवारी रात्री पोहचली. तिने गावाबाहेर आपल्या पतीसोबत टेंटमध्ये रात्र काढण्याचा निर्णय घेतला. तिथे सात स्थानिक आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार आणि मारहाण केली. तिच्या पतीचेही हात-पाय बांधून त्यालाही मारहाण करण्यात आली. त्या रात्री आरोपी माझी हत्या करतील, अशा भावना पीडितेने पोलिसांसमोर व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, या घटनेनंतर स्पॅनिश महिला स्वत: बाईक चालवून रुग्णालयात उपचारासाठी गेली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी स्वत: घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास केला.