नवी दिल्ली - झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिश्रा यांच्या संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापे टाकले. एकूण 18 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. साहिबगंज जिल्ह्यातील बरहेट आणि राजमलमध्ये धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये कोट्यवधी रुपयांची कॅश आणि इतरही अनेक गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंकज मिश्रा यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. खाण घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच मिश्रा यांचे निकटवर्तीय असलेल्या हिरा भगत यांच्या घरावरदेखील छापा टाकण्यात आला. भगत यांच्या घरात ईडीला घबाड सापडलं. बराच वेळ पैशांची मोजदाद सुरू होती. ईडीनं हस्तगत केलेल्या नोटांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ईडीनं एकूण पाच कोटींची रोख रक्कम जप्त केल्याची माहिती मिळत आहे.
भाजपाचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी ईडीने केलेल्या कारवाईवरून मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पंकज मिश्रा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांची इमानदारी आज समोर आली आहे. ईडीने केलेल्या छापेमारीत पंकज मिश्रा आणि त्यांच्या समर्थकांकडे पाच कोटींहून अधिक रोख रक्कम आणि कोट्यवधींचीं संपत्ती मिळाली, आणखी किती लूटणार? असं दुबे यांनी म्हटलं आहे.
5 कोटी रोख रकमेशिवाय अनेक महत्त्वाची कागदपत्रेही सापडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, ईडीकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. विशेष म्हणजे, शुक्रवारी ईडीच्या पथकाने पंकज मिश्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले होते. पंकज मिश्रा यांची उत्तराखंडमध्ये चौकशी केल्यानंतर ईडीच्या पथकाने त्यांची सुटका केली. या प्रकरणात ईडीच्या पथकाने आतापर्यंत 5 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. ईडीने ज्या लोकांवर छापे टाकले आहेत त्यांना रांचीला बोलावण्यात आले असून ईडी त्यांची रांचीमध्ये चौकशी करणार आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.