मुंबई : दिवंगत अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयच्या विशेष पथकाची नेमणूक करावी अशी मागणी करणारा अर्ज जियाची आई राबिया खान यांनी उच्च न्यायालयात केला. मात्र, या अर्जाला अभिनेता सूरज पांचोलीने विरोध केला आहे. जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सूरजवर आहे.
जिया खान आत्महत्येचा तपास आधी मुंबई पोलिसांकडे होता. त्यानंतर राबिया खान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने तपास सीबीआयकडे वर्ग केला. सीबीआयनेही जिया खानने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर राबिया यांनी पुन्हा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय अंतर्गत विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे. एसआयटीने पूर्णवेळ केवळ याच प्रकरणावर काम करावे, अशी मागणी राबिया यांनी याचिकेद्वारे केली आहे. ही मागणी वैध आहे. कारण घटना घडून बराच काळ लोटला आहे, असा युक्तिवाद राबिया यांच्यावतीने ॲड. शेखर जगताप यांनी केला. राबिया यांच्या याचिकेवर पांचोलीने उत्तर दाखल केले आहे. ‘विशेष न्यायालयाने ३० जानेवारी २०१८ मध्ये आरोप निश्चित केले आहेत आणि आतापर्यंत १६ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आलेली आहे. राबिया यांचीही साक्ष नोंदविली आहे. हा खटला अंतिम टप्प्यात आला असून, याचिकेतील मागण्या मान्य केल्या तर न्यायपूर्ण ठरणार नाही. तथ्यहीन याचिका दाखल करून खटल्यास विलंब करणे, हेच राबिया यांचे एकमेव उद्दिष्ट आहे, असे सूरजने दाखल केलेल्या उत्तरात म्हटले आहे. एसआयटी स्थापन करण्याची विनंती राबिया यांनी पहिल्यांदाच केलेली नाही. त्यांनी २०१६ मध्येही अशीच मागणी करणारी याचिका दाखल केली होती आणि उच्च न्यायालयाने ती फेटाळली होती, असे म्हणत सूरजने राबियांच्या याचिकेला विरोध केला व याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली.
सीबीआयच्या उत्तराकडे लक्ष सीबीआयतर्फे ॲड. संदेश पाटील यांनी राबियांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी मुदत मागितली. सीबीआयच्या भूमिकेबाबत न्यायालयाने विचारणा केली असता पाटील यांनी सांगितले की, तपास सुरू असल्याने पुढील तपासाची मागणी अयोग्य ठरत नाही. सीबीआय हा निर्णय कदाचित न्यायालयावर सोपवेल. सीबीआयने उत्तर दाखल केल्यावरच त्यांच्या भूमिकेबाबत चित्र स्पष्ट होईल, असे पाटील यांनी न्यायालयाला सांगितले.