मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस येथे काल दुपारच्या सुमारास उभ्या असलेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या ५ कांड्या आणि बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली होती. सुरक्षा विभागाने तपास केला असता, ती बॉम्बसदृश वस्तू बॉम्ब नसल्याचे सिद्ध झाले. मात्र, या साहित्यासह धमकीचे पत्रही होते. त्यात मुंबईत बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली आहे. मात्र, तसे काहीही नसून पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस अटक करण्याच्या उद्देशाने हा कट आखला असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी लोकमान्य टिळक पोलिसांनी एका व्यक्तीला बुलडाणा येथून ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.
काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शालिमार एक्स्प्रेसची साफसफाई करत असताना, जिलेटीन कांड्या आणि बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्या. त्यानंतर, तात्काळ लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, बॉम्बशोधक आणि निकामी पथक, श्वानपथक दाखल झाले होते. त्यामुळे स्थानकाला छावणीचे स्वरूप आले होते.
सुरक्षा विभागाने स्थानक परिसर रिकामा करून एक्स्प्रेसची तपासणी केली. या तपासात बॅटरी, विद्युत तारा, पक्कड, ५ जिलेटीनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र मिळाले. एक्स्प्रेसमधील हे साहित्य आणि पत्र कुठून आले याचा शोध सुरू आहे. दरम्यान, मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या लक्ष्य असते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत आणखी वाढ केली आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम २८५ आणि भारतीय रेल्वे कायदा कलम १६४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.