ठाणे - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याच्या आवारात ठाण्यातील अभियंत्याला झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये मुंबई पोलीस दलातील तीन पोलिसांचाही सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.
घोडबंदर रोडवरील कावेसर भागात राहणारया अनंत करमुसे या अभियंत्याला फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा जाब विचारत पोलिसांच्याच फायबर काठीने मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात 6 एप्रिल 2020 रोजी दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. ही काठी तुटेपर्यंत आधी मारहाण झाली. त्यानंतर त्यांनी माफी मागितल्यानंतरही तिथे उपस्थित असलेल्यांनी मारहाण केल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. वर्तकनगर पोलिसांनी तक्रारदार करमुसे यांच्या घराजवळील सीसीटीव्ही चित्रण तसेच या घटनेशी संबंधितांचे जबाब घेण्याचे काम सुरु केले आहे. बुधवारी दिवसभर यातील संबंधित अनेकांची त्यांनी चौकशी केली.
यामध्ये मुंबई पोलीस दलातील सुरक्षा विभागातील तीन पोलीस कर्मचारयांचा तसेच काही कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकारयाने सांगितले. तसे असेल तर ते कोण पोलीस कर्मचारी आहेत? याची चौकशी केली जाणार आहे. अर्थात, वर्तकनगर पोलिसांनी यासंदर्भात अधिकृरित्या आपली प्रतिक्रीया व्यक्त करण्यात असमर्थता दर्शविली आहे.
दरम्यान, ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गणवेशातील दोघा पोलिसांसह चौघा जणांनी करमुसे यांना घरातून मंत्री आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले होते. आव्हाडांच्या उपस्थितीतच त्यांना अमानुष मारहाण झाली. या प्रकरणात खुद्द मंत्र्याचाच सहभाग असल्याचा आरोप असल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही केळकर आणि डावखरे यांनी यपत्रातून पोलीस आयुक्तांना केली आहे.