जांजगीर – छत्तीसगडच्या जांजगीर चांपा जिल्ह्यात एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका व्यक्तीनं मेडिकल दुकानदाराला पळवून पळवून मारलं कारण तो डॉक्टरांच्या पावतीशिवाय औषधं खरेदी करण्यासाठी आला होता. मेडिकल दुकानदारानं औषध देण्यापासून मनाई केली म्हणून तो व्यक्ती तलवार घेऊन त्याला मारण्यासाठी सरसावला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण जांजगीर चांपा जिल्ह्यातील हसौद येथील आहे. २९ ऑगस्टला सकाळी हसौदच्या कृष्णा मेडिकल दुकानात दोन जण विना डॉक्टरांच्या पावतीशिवाय औषध खरेदी करण्यासाठी पोहचले. परंतु जेव्हा मेडिकल दुकानदाराने डॉक्टरांची पावती मागितली तेव्हा दोघांनी पावती नाही तू औषधं दे असं सांगितले. मेडिकल दुकानदाराने औषध देण्यास नकार दिला असता दुकानात गोंधळ सुरू झाला. औषध घेण्यासाठी आलेली दोघं मेडिकल दुकानदाराशी वाद घालून तिथून निघून गेले. परंतु त्यानंतर काही वेळाने ४ जण तलवार घेऊन मेडिकल दुकानदाराच्या दिशेने धावत येत होते.
शेजाऱ्याच्या घरात लपवून वाचवला जीव
जसे मेडिकल दुकानदाराने त्याच्या दिशेने चौघं तलवार घेऊन येताना पाहिलं तो जीव वाचवून पळू लागला. मेडिकल दुकानदाराच्या मागे चौघंही तलवार घेऊन पाठलाग करत होते. मात्र कसंबसं मेडिकल दुकानदाराने शेजारील एका घरात जाऊन स्वत:चा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
जेव्हा आरोपी घटनास्थळावरून पळाले त्यानंतर मेडिकल दुकानदाराने पोलीस स्टेशनला पोहचून गुन्हा नोंद केला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला असता दुकानात लागलेल्या सीसीटीव्हीतील प्रकार पाहिला. त्यानंतर पोलिसांनी आर्म्स कायद्यातंर्गत चार लोकांविरोधात गुन्हा दाखल करून घेत त्यांना अटक केली. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी पीडित दुकानदाराच्या तक्रारीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवलं आहे.