JNU : उर्वशी चुडावालाला हायकोर्टाचा दिलासा; अटक झाल्यास जामिनावर सुटका करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 07:50 PM2020-02-11T19:50:05+5:302020-02-11T19:53:35+5:30
एलजीबीटीक्यूच्या कार्यक्रमादरम्यान जेएनयूचा विद्यार्थी शारजील इमाम याच्या समर्थनार्थ देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून देशद्रोहाचा गुन्हा
मुंबई - देशद्रोहाचा आरोप असलेल्या उर्वशी चुडावाला याला मुंबई हायकोर्टकडून आज अंतरिम दिलासा मिळाला आहे. अटक केल्यास २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आझाद मैदान पोलिसांना हायकोर्टाने अंतरिम आदेश दिले आहेत. एलजीबीटीक्यूच्या कार्यक्रमादरम्यान जेएनयूचा विद्यार्थी शारजील इमाम याच्या समर्थनार्थ देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आलेल्या उर्वशी चुडावाला हिला अटकेपासून संरक्षण देण्यास हायकोर्टाने मागील सुनावणीदरम्यान दिलासा देण्यास नकार दिला होता.
५ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त सत्र न्या. प्रशांत राजवैद्य यांनी उर्वशी चुडावाला (२२) हिला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यासही नकार दिला होता. याविरोधात चुडावाला हिने हायकोर्टाने धाव घेतली. आपण एका समुदायाच्या विरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी घोषणा दिली, असा आरोप आपल्यावर आहे. आपली घोषणा एका विशिष्ट समाजाच्या लोकांना आवडली नाही, याचा अर्थ आपल्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद चुडावाला हिचे वकील विजय हिरेमठ यांनी न्यायालयात केला. परंतु, न्या. शिंदे यांनी तिला तुर्तास अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत तिच्या याचिकेवर पुढील सुनावणी आज ठेवली होती. आज पार पडलेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.
JNU : उर्वशी चुडावालाला अटकेपासून तुर्तास दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
पोलीसांच्या म्हणण्यानुसार, एलजीबीटीक्यूने गेल्या आठवड्यात आझाद मैदानावर आंदोलन केले. या आंदोलनात चुडावाला हिने मोठमोठ्याने घोषणा दिली. ‘शरजील तेरे सपनो को हम मंजिल तक पहुचायेंगे,’ अशा घोषणा तिने दिल्या. शरजीलने देशविरोधी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत, चुडावालाने त्याला समर्थन देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. देशाचा शत्रू असलेल्या व्यक्तीला तिने पाठिंबा दिला. पोलिसांनी तिच्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले. मात्र, आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ती पोलीस ठाण्यात गेलीच नाही. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवित शरजील इमाम याने दिल्लीच्या जामिया मिलीया विद्यापीठात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला गेल्या महिन्यात अटक केली.