मुंबई : थायलंडमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गरजू तरुणांना लाओसमध्ये नेत त्यांच्याकडून जबरदस्तीने अनधिकृत कॉल सेंटरमध्ये ठगीचे काम करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईत समोर आला. तरुणांनी मायदेशी परतण्याचा प्रयत्न करताच त्यांना खुर्चीला बांधून मारहाण केली जात होती. दूतावासाच्या मदतीने मायदेशी परतलेल्या दोन तरुणांच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. गुन्हे शाखेच्या कक्ष ८ कडून याप्रकरणी तपास सुरू आहे.
ठाण्यातील रहिवासी असलेला सिद्धार्थ यादव (२३) याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, वडील दुबईमध्ये सिनीअर मेकॅनिक म्हणून नोकरी करत असल्याने आपणही विदेशात नोकरी करावी म्हणून त्याची धडपड सुरू होती. त्याला डिसेंबर २०२२ मध्ये रोहित नावाच्या तरुणाचा कॉल आला. रोहितने त्याला नोकरी मिळवून देणाऱ्या जेरी जेकब आणि सुश्मिता दबडे नावाच्या दोन एजंटांची नावे सांगितली. पुढे थायलंडमध्ये एका कॉल सेंटरमध्ये बसून नागरिकांना, ग्राहकांना क्रिप्टो करन्सीची माहिती देण्याचा जॉब ऑफर देत, सिद्धार्थकडून ३० हजार रुपये घेतले.
सिद्धार्थकडून कागदपत्रे घेत नोकरीचे ‘ऑफर लेटर’, विमानांची तिकिटे पाठविण्यात आली. ३० डिसेंबर २०२२ ला सिद्धार्थ नोकरीसाठी थायलंडला निघाला. त्यानंतर लाओस देशाच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले. तेथे दिल्ली, पंजाब येथून आलेले आणखी पाच ते सहा भारतीय तरुणांसह बोटीने लाओस देशात नेत गोल्डन टंगल येथे गॉडफ्री व सनी यांची भेट करून दिली. एका विदेशी नावाने बनावट प्रोफाईल बनवून विदेशातील लोकांशी चॅटिंग सुरू करण्यास सांगितले.
बनावट प्रोफाईलवरून अमेरिका, कॅनडा, यूरोप देशातील नागरिकांना फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉकवरती लिंक पाठवून त्यांची फसवणूक करत होते. तरुणांनी नकार देताच दुसऱ्या फसवणुकीच्या कामात ढकलले. अखेर दूतावासाच्या मदतीने तरुण मायदेशी परतले. सिद्धार्थने जेरी जेकब, गॉडफ्री, सनी यांच्या विरोधात विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे.
खुर्चीवरून मागे बघितले तरी दंड आरोपी कामादरम्यान क्षुल्लक कारणावरून दंड ठोठावत होते. काम करताना खुर्चीवरून मागे वळून बघितले, त्यांना दंड ठोठावण्यात येत होता. पुढे अर्ध्याहून अधिक पगाराची रक्कम दंड म्हणून कमी केली होती. काम करणाऱ्यांसोबत वाद झाल्यानंतर कंपनीने तरुणांना दंड केला. तरुणांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधून भारतात परतले.
शेकडो अडकले तरुणांनी तक्रार करू नये म्हणून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या टोळीने शेकडो तरुणांना गंडविल्याचा संशय आहे.