नवी दिल्ली : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी प्रामुख्याने लहान मुलांची उत्पादने बनविते. काही वर्षांपूर्वी या कंपनीच्या उत्पादनांमुळे मुलांना कॅन्सरचा धोका असल्याचे समोर आल्याने ग्राहकांचा विश्वास या कंपनीवरून उडाला होता. हा विश्वास पुन्हा मिळविण्याच्या प्रयत्नात असताना कंपनीने पुन्हा एकदा ग्राहकांची फसवणूक केली आहे.
प्रकरण जीएसटीशी संबंधित आहे. राष्ट्रीय लाभ प्रतिबंधक प्राधिकरणाने जॉन्सन अँड जॉन्सनला 230.41 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. जीएसटीमध्ये कपात केल्यानंतर त्याचा थेट फायदा ग्राहकाला न देता किंमतीमध्ये चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला आहे. 15 नोव्हेंबर 2017 ला काही वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यावरून 18 टक्के करण्यात आला होता. हा 10 टक्क्यांचा फायदा कंपनीने ग्राहकांना न देता फायदा उकळल्याचे सिद्ध झाले आहे.
एनएएने कंपनीला सोमवारी नोटीस बजावली असून तीन महिन्यांत दंडाची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कंपनीकडून जानेवारीमध्ये खुलासा मागितला आहे. यावर कंपनीचे म्हणणे असे आहे की, अशा प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकरची मार्गदर्शक तत्वे नसल्याने कंपनीने त्यांच्या हिशोबाप्रमाणे किंमत लावली होती. यावर एनएएने कंपनीकडून मिळालेली माहिती आणि आकडे अर्धवट असल्याचे सांगत त्यांचा दावा फेटाळून लावला होता.
2017-18 मध्ये कंपनीला भारतातून 5828 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामुळे या कंपनीसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. या वर्षात कंपनीला 688 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. प्रॉक्टर आणि गॅम्बल कंपनीलाही एनएएने जीएसटीचा फायदा ग्राहकांना दिला नाही म्हणून 250 कोटींचा दंड ठोठावला आहे. गेल्या वर्षी नेसले इंडिय़ानेही 100 कोटींची केलेली नफेखोरी पकडली गेली होती.