पुणे : मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा घेऊन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्या बदल्यात २ कोटी रुपये व रास्ता पेठेतील भुखंड खंडणी स्वरुपात देण्याच्या मागणी प्रकरणात न्यायालयाने पत्रकार, बडतर्फ पोलिसासह तिघांना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे़. दरम्यान, यातील महिला आरोपीचे वकील विजयसिंग ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला असून आपण स्वत: पीडित असून बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी हा खोटा गुन्हा माझ्यावर दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे याचा तपास हा पुणेपोलिसांकडून काढून तो सीबीआय अथवा सीआयडीकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, आणि एक महिला यांना कोथरुड पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली होती. त्यांना बुधवारी सकाळी न्यायालयात हजर केले. या महिलेचे दहावी शिक्षण झाले असताना तिने ज्या करारनाम्यावर फिर्यादीच्या सह्या घेतल्या, तो इंग्रजीमध्ये असून तो कोणाकडून लिहून आणला. या महिलेची इतर आरोपींशी ओळख कशी झाली, याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. रास्ता पेठ येथील जागेत शैलेश जगताप बसतात.तेथे त्यांचे कार्यालय आहे. जगताप यांच्या घर झडतीत रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे. ते त्यांनी कोठून आणले, याचा तपास करायचा आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांच्याविरुद्ध फसवणूक व अन्य कलमाखाली पुणे शहरात ५ गुन्हे दाखल आहेत. तसेच अमोल चव्हाण त्याच्याविरुद्धही ५ गुन्हे दाखल आहेत. या आरोपींच्या मदतीने अन्य दोघा आरोपींना अटक करायची आहे. त्यांनी या गुन्ह्याचा कट कोठे आणि कसा केला.या कटामागील बोलवता धनी कोणी आहे का याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनीन्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने अधिक तपासासाठी १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पीडित महिलेच्या वतीने अॅड. विजयसिंग ठोंबरे यांनी सांगितले की, सुधीर कर्नाटकी हे बलात्काराच्या गुन्ह्यात जामिनावर असून तो खटला मागे घ्यावा,यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्याने परदेशातून पीडित महिलेला धमक्यासुद्धा दिलेल्या आहेत. या फिर्यादीतील सर्व मजकूर हा खोटा व सुडघेण्याच्या उद्देशाने नमूद केलेला आहे. कर्नाटकी हे १० ते २० बॉडीगार्ड घेऊन बलात्कारासंबंधित खटल्यासाठी येत असे. पीडित केवळ एकट्या होत्या.म्हणून त्यांच्याबरोबर अमोल चव्हाण कोर्टात येत असे. त्या या गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही. कर्नाटकी व पीडित महिला २००७ पासून तब्बल १३ वर्षे बरोबर होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवून छळ केला. एक पीडित असूनही खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुणे पोलिसांकडून तो काढून घेऊन सीबीआय अथवा सीआयडीकडे सोपविण्यात यावा, अशी आम्ही मागणी केल्याचे अॅड.ठोंबरे यांनी सांगितले.