उन्नाव - उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात एका पत्रकाराचा मृतदेह रेल्वे ट्रॅकच्या शेजारी सापडल्याने खळबळ उडाली आहे. पत्रकाराच्या मृत्यूवरून कुटुंबीयांनी पोलिसांवर हत्येचा आरोप केला. मृत पत्रकाराच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस एसआय सुनीता चौधरी आणि त्यांचा वाहनचालक अमर सिंह आणि अन्य एका अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३०२, १२० ब आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापूर्वी रात्री उशिरापर्यंत पोस्टमार्टम ऑफीसमध्ये मृत पत्रकाराचे कुटुंबीय महिला पोलिस अधिकारी आणि त्यांच्या वाहनचालकाविरोधात आक्रोष करत होते.पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत मृत पत्रकार सूरज उर्फ आनंद पांडे यांच्या आई लक्ष्मी पांडे यांनी सांगितले की, पत्रकारितेदरम्यान त्यांच्या मुलाची ओळख ही पोलीस उपनिरीक्षक असलेल्या सुनीता चौरसिया यांच्याशी झाली. सुनिता चौरसिया अनेकदा आपल्या घरी आल्या होत्या. दरम्यान, ११ नोव्हेंबर रोजी सुनीता चौरसिया यांचा वाहनचालक अमर सिंह याने फोनवर सुनिता चौरसिया यांचे नाव घेत फोन करून शिविगाळ केली तसेच बघून घेईन, अशी धमकी दिली. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी सूरजला फोन करून बोलावण्यात आले. त्यानंतर त्याची काहीच माहिती मिळाली नाही.तक्रारीतील उल्लेखानुसार सूरज घरातून बाहेर पडल्यापासून त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. तीनच्या सुमारास कोतवाली पोलिसांनी सूरजचा मृतदेह रेल्वे ट्रॅकच्या शेजारी सापडल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी सुनीता चौरसिया, अमर सिंह आणि त्याच्या एका सहकाऱ्याविरोधात कारस्थान रचून पत्रकाराची हत्या करून मृतदेह रेल्वे ट्रॅकच्या शेजारी टाकल्याचा आरोप तक्रारीमधून केला.