जयपूर : राजस्थानमधील (Rajasthan) एका न्यायाधीशांवर (Judge) गंभीर आरोप करण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीश जितेंद्र गोलिया (Jitendra Goliya)यांच्यावर 14 वर्षीय एका मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर न्यायाधीश जितेंद्र गोलिया आणि इतर दोघांविरोधात पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत. मुलाच्या आईने पोलिसात न्यायाधीश आणि इतर दोघांविरोधात तक्रार केली होती. (Judge Jitendra Singh Goliya, accused Anshul Soni and Rahul Katara booked for allegedly raping minor boy in Rajasthan)
दरम्यान, हे प्रकरण समोर येताच रविवारी न्यायाधीश जितेंद्र गोलिया यांना जोधपूर उच्च न्यायालयाने (High Court) तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. जितेंद्र गोलिया यांची भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयात विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुलाच्या आईने तिच्या तक्रारीत आरोप केला आहे, की लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (एसीबी) आणि इतर दोघांशी संबंधित खटले हाताळणारे विशेष न्यायाधीश गेल्या एक महिन्यापासून मुलाचा काही नशेचे पदार्थ देऊन लैंगिक छळ करत होते.
पीडित मुलाच्या आईने आरोप केला आहे की,न्यायाधीश जितेंद्र गोलिया आणि इतर दोन आरोपींनी तिला याबद्दल बोलल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. न्यायाधीश जितेंद्र गोलिया यांचा स्टेनो अंशुल सोनी व आणखी एक कर्मचारी राहुल कटारा अशी अन्य आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अंशुल सोनी व राहुल कटारा या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, एसीबीचे सर्कल ऑफिसर परमेश्वर लाल यादव यांच्यासह सोनी आणि कटारा यांनी मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे भरतपूर पोलिसांनी सांगितले. तसेच, न्यायाधीशांनी या मुलाशी जिल्हा क्लब कंपनी बाग येथे मैत्री केली. याठिकाणी मुलगा टेनिस खेळायला जात होता. यानंतर त्याचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात झाली, असे पोलिसांनी सांगितले.