नंदुरबार : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकाची पगारवाढ, आयोगाच्या हप्त्याच्या रकमेचे बिल काढून देण्यासाठी ७ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या नंदुरबार पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी अटक केली. शिवाय याच शिक्षकाकडून मोघम स्वरूपात दोन हजारांची लाच मागणाऱ्या आणखी एका कनिष्ठ सहायकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. दादाभाई फुला पानपाटील (५४) कनिष्ठ सहायक व सुखदेव भुरसिंग वाघ (४३) नोकरी, कनिष्ठ सहायक, पंचायत समिती, नंदुरबार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथून बदली करून आलेल्या शिक्षकाची सेवा येथे सुरू झाली होती. त्यांचा पगारवाढ, वेतन आयोगाच्या हप्त्याच्या रकमेचे बिल काढण्यासाठी त्यांनी पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक दादाभाई पानपाटील यांच्याकडे विनंती केली होती. पानपाटील यांनी यासाठी सात हजार रुपयांची मागणी २६ जून रोजी केली. ८ जुलै रोजी सायंकाळी सात हजार रुपये देण्याचे ठरले. पंचायत समितीच्या वाहन तळाजवळील लोखंडी गेटजवळ पानपाटील यांनी सात हजार रुपयांची लाच शिक्षकाकडून स्वीकारताना सापळा लावून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली.
याशिवाय मोघम स्वरूपात कनिष्ठ सहायक सुखदेव वाघ यांनी देखील शिक्षकाकडून दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. या कारवाईत त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी पंचायत समितीत ही कारवाई झाल्यानंतर त्या ठिकाणी गर्दी झाली होती.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राकेश आ. चौधरी, निरीक्षक समाधान वाघ, हवालदार विजय ठाकरे, देवराम गावित, संदीप नावाडेकर, अमोल मराठे व मनोज अहिरे यांनी केली.