चैतन्य जोशी, वर्धा: शेतामध्ये कॅनलवरुन ओलीतासाठी पाणी घेण्याकरिता लवकर वीज मीटर लावून देण्यासाठी कनिष्ठ अभियंता वासुदेव नागोराव पारसे (५८) रा.विनायक अपार्टमेंट, दत्तात्रय नगर नागपूर, याला एक हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई २७ रोजी अडेगाव वीज वितरण केंद्रात करण्यात आली. याप्रकरणी देवळी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार शेतकरी यांचे मौजा गौळ ता. देवळी येथे शेत आहे. त्यांच्या शेत सर्वे ८० आराजी ४.०५ हेक्टरच्या शेतात कॅनलवरुन ओलीतासाठॅ पाणी घेण्याकरिता शेतात वीज मिटर लावणे आवश्यक होते. मात्र, मीटर लावण्यासाठी लाचखोर कनिष्ठ अभियंता वासुदेव पारसे याने एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी शेतकऱ्याकडे केली. शेतकरी अभियंता वासुदेव पारसे याला अडेगाव येथील वीज वितरण केंद्रात लाचेची रक्कम देण्यासाठी गेला होता. शेतकऱ्याने एक हजार रुपयांची लाच अभियंत्याला दिली. अभियंत्याने लाचेची रक्कम स्विकारताच लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यास रंगेहात पकडले.
कनिष्ठ अभियंता वासुदेव पारसे याने लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लाच रकमेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारल्याने त्यास अटक करण्यात आली. याप्रकरणी देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते, उपविभागीय पोलिस अधिकारी डी.सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संदीप थडवे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बावणेर, संतोष बावणकुळे, कैलाश वालदे, प्रतिम इंगळे यांनी केली.