जळगाव : अपार्टमेंटमधील रिकामा प्लॅट बघून येत नाही, तोच अवघ्या २० मिनिटात ॲड.जुबेर अहमद जहांगीर खान यांची २ लाख ६० हजार रुपयांची रोकड असलेली दुचाकीची हँडलला लावलेली बॅग घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.१५ ते १०.३५ या वेळेत सालार नगरात घडली. संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲड.जुबेर खान हे जळगाव न्यायालयात वकीली व्यवसाय करतात. मंगळवारी सकाळी न्यायालयात जाण्यासाठी घरातून निघाले व बाहेर उमर फारुख शेख यांच्यासोबत ते अपार्टमेंटमधील रिकामा प्लॅट बघण्यासाठी गेले. तत्पूर्वी त्यांनी २ लाख ६० हजार रुपये रोकड असलेली बॅग तसेच दुसरी लॅपटॉपची बॅग दुचाकीच्या (क्र.एम.एच.१९ बी.आर.३२५५) हँडलला लावली. या बॅगांमध्ये रोकडसह, तीन पेनड्राईव्ह, बँकाचे धनादेश इतर कागदपत्रे होती. २० मिनिटात अपार्टमेंटच्या खाली आल्यावर दुचाकीच्या हँडलला अटकवलेली बॅग गायब झाली होती. याप्रकाराने हादरलेल्या खान यांनी आजुबाजूला चौकशी केली व एका इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक व्यक्ती संशयास्पद दिसून येत आहे.
या घटनेनंत ॲड.खान यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना झाल्याप्रकाराची माहिती दिली. शिकारे, सहायक फौजदार अतुल वंजारी व सहकाऱ्यांनी घटनास्थळ तसेच सीसीटीव्ही फुटेजवरुन माहिती संकलित करुन संशयितांचा शोध घेतला. दुपारी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.